तिरंगी लढतीमुळे आगामी निवडणुकीची तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 01:00 AM2018-05-13T01:00:24+5:302018-05-13T01:00:24+5:30

आणखी वर्षाभरानंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने होत असल्याने राजकीय पक्ष अहमहमिकेने तयारीला लागले आहेत.

 Training for upcoming elections due to the tri-match | तिरंगी लढतीमुळे आगामी निवडणुकीची तालीम

तिरंगी लढतीमुळे आगामी निवडणुकीची तालीम

Next

नाशिक : आणखी वर्षाभरानंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने होत असल्याने राजकीय पक्ष अहमहमिकेने तयारीला लागले आहेत. नाशिकच्या जागेवर तिरंगी लढतीत ज्या पद्धतीने राजकीय डावपेच खेळले जात आहेत, ते पाहता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा ‘ट्रेलर’ म्हणून त्याकडे पाहावे लागेल.  विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेवर तसे पाहिले तर राष्टÑवादी कॉँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. अगदी एक सदस्यसंख्या असतानाही राष्टÑवादीने ही जागा ज्या पद्धतीने स्वत:कडे खेचून आणली ते पाहता निव्वळ राजकीय संख्याबळावर ही निवडणूक जिंकता येते हा भ्रम ठरावा. राजकीय लागेबांधे, जनसंपर्क, हितसंबंध व डावपेचाबरोबरच ‘अर्थकारण’ करण्याच्या क्षमतेवरच ही निवडणूक आजवर लढविली व जिंकली गेली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्याची त्याच पद्धतीने सुरुवातही झाली आहे. राज्यपातळीवर सेना व भाजपाने परस्पर सहमतीने प्रत्येकी तीन जागा वाटून घेत आपले उमेदवार उभे केले असले तरी, ज्या जागांवर पक्षाचा उमेदवार नाही तेथे काय राजकीय भूमिका घ्यायची हे मात्र दोघांनीही गुलदस्त्यात ठेवून एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वाटा मोकळ्या ठेवल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाचे उमेदवार त्या त्या मतदारसंघात आपल्या सोयीने त्याचा अर्थ लावून प्रचाराला लागले आहेत. नाशिकच्या जागेवर शिवसेनेने नरेंद्र दराडे यांची उमेदवारी जाहीर करून भाजपावर मात केली असली, तरी भाजपानेही जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी यांना छुपी मदत करून शिवसेनेच्या मार्गात अडथळा उभा केला आहे. राष्टÑवादीने शिवाजी सहाणे या गतवेळच्या प्रतिस्पर्ध्याला गळाला लावून उमेदवारी गळ्यात मारली. राष्टÑवादीला कॉँग्रेसने पाठिंबा दिल्याने तिरंगी होणाºया या निवडणुकीच्या निमित्ताने खेळल्या गेलेल्या राजकीय डावपेचाकडे मात्र आगामी निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे.  सहा वर्षांनंतर होत असलेल्या यंदाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सन २०१४ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा परिणाम अपेक्षिला जातो आहे. देश व राज्य पातळीवरील सत्तांतराने नाशिक जिल्ह्यात जी समीकरणे बदलली आहेत त्याचा मोठा परिणाम होणार आहे.  गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत दोन्ही कॉँग्रेसचे घटलेले संख्याबळ, शिवसेना व पाठोपाठ भाजपाचे वाढलेले बळ, छोटे पक्ष व अपक्षांनी मारलेल्या मुसंडीचा विचार करता या निवडणुकीत कोण बाजी मारेल? याचा अंदाज बांधणे आज कठीण असल्यामुळेच की काय, राजकीय डावपेचाच्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याची कोणतीही संधी शिवसेना, भाजपा व कॉँग्रेस आघाडीने सोडलेली नाही. अगदी शिवसेनेचा उमेदवार रिंगणातूनच बाद करण्यासाठी खेळली गेलेली खेळी व त्यासाठी जिल्हा प्रशासनाने बारा तास घातलेल्या घोळाला राजकीय वास आल्याशिवाय राहिला नाही. सर्वाधिक संख्याबळ असल्याने शिवसेनेने विजयाचा दावा केला असला तरी, नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारीने पक्षांतर्गत व्यक्त केल्या जाणाºया नाराजीने पक्षनेतृत्व चिंतेत आहे. भाजपाने आपले पत्ते अद्याप उघड केले नाहीत, उलट पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे निमित्त पुढे करून सेनेची कोंडी केली आहे.  दुसरीकडे भाजपाचे पदाधिकारी व नगरसेवक जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी यांच्याबरोबर उघड उघड फिरून सेनेला डिवचत आहेत.
‘थैल्या’ रिकाम्या करण्याची धमक
आघाडीच्या अल्पबळावर राष्टÑवादी कॉँग्रेसचे शिवाजी सहाणे निवडणुकीला सामोरे जात असून, त्यांची सारी मदार शिवसेनेच्या नाराज मंडळींवर व धर्मनिरपेक्ष मतांवर अवलंबून आहे. याच मतांवर डोळा ठेवून परवेज कोकणी विजयाचे गणित मांडत आहेत. त्यामुळे निवडणुकीचा अंदाज आजच बांधणे कठीण असला तरी, राजकीय ताकदीपेक्षाही अर्थकारणावर अवलंबून असलेल्या जय-पराजयाच्या लढाईत ‘थैल्या’ रिकाम्या करण्याची धमक ठेवणाºयालाच निवडणुकीत विजय सुकर आहे.

Web Title:  Training for upcoming elections due to the tri-match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.