जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रशिक्षण : मविप्रच्या मैदानावर होणार योगदिन
By admin | Published: June 18, 2015 11:46 PM2015-06-18T23:46:23+5:302015-06-18T23:50:37+5:30
विद्यार्थी गिरविणार योगाचे ‘धडे’
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थी सकाळी शाळेत योगाचे धडे गिरवणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमधील क्रीडा व योग शिक्षकांना १८ व १९ जून रोजी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
२० जून रोजी विद्यार्थ्यांचा शालेय स्तरावर याच योग शिक्षकांकडून सराव करून घेतला जाणार आहे. २१ जून रोजी जिल्ह्यात सर्व शालेय स्तरावर स. ७ ते ७.३३ या वेळेतच आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व शाळांमध्ये निबंध, वक्तृत्व व पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचे नियोजन गटशिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी यांच्यामार्फत शालेय स्तरावर पोहचविण्यात आलेले आहे. या स्पर्धा २१ जून रोजीच योग दिनाचा मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर शालेय-स्तरावरच घेण्यात याव्यात. या कार्यक्रमाचे फोटो, वर्तमानपत्राची कात्रणे व संपूर्ण कार्यक्रमाचा अहवाल मुख्याध्यापकांनी, प्राचार्यांनी गट-शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवावा. गटशिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी यांनी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा झाल्याचा अहवाल जिल्हा कार्यालयास सादर करावा. २१ जूनला जिल्हा परिषद व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने योग दिनाचा मुख्य कार्यक्रम केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी ७ ते ७.३३ या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमास अधिकारी व पदाधिकारी यांनी सकाळी साडेसहा वाजता मैदानावर योगा करण्यासाठी सैल पोशाख व सतरंजीसह उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर व प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी केले आहे. (प्रतिनिधी)