नाशिक ग्रामीण पोलीस दलात १ हजार ९५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By नामदेव भोर | Published: June 15, 2023 04:56 PM2023-06-15T16:56:10+5:302023-06-15T16:57:54+5:30
सर्व कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश मिळताच कार्यमुक्त करण्याचे आदेशही पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यानी संबंधित विभागप्रमुख व पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नाशिक : जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी ग्रामीण पोलीस दलात विविध पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून खांदेपालट केला असून, यात निश्चित कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह कर्तव्यात कसुरी करणाऱ्या ९८८ कर्मचाऱ्यांचा समावेश असून, सुमारे १०८ कर्मचाऱ्यांची विनंतीनुसार बदली करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश मिळताच कार्यमुक्त करण्याचे आदेशही पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यानी संबंधित विभागप्रमुख व पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हा ग्रामीण पोलिस दलात मोठ्या प्रमाणात खांदेपालट करण्यात आले असून, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक व ग्रेड पोलिस उपनिरीक्षक पदावरील सुमारे शंभर अधिकाऱ्यांसह पोलिस हवालदार पदावरील २८९, पोलिस नाईक २५७, पोलिस शिपाई २७१ कर्मचाऱ्यांसह चालक सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस नाईक व पोलिस शिपाई वर्गातील ७१ बदल्यांचे आदेश काढले आहेत, तर सहायक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हवालदार, पोलिस शिपाई यासारख्या विविध पदांवरील १०२ विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या असून, चालकवर्गातही विविध पदांवरील पाच कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.