नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 01:44 AM2022-04-21T01:44:14+5:302022-04-21T01:46:31+5:30
पोलीस आयुक्तालयाचे बहुचर्चित पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची अखेर राज्य शासनाच्या गृह विभागाने मुंबईत बदली केली आहे. काही दिवसांपूर्वीच पाण्डेय यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना विनंती बदलीकरिता अर्ज केला होता. त्यांच्या रिक्त पदावर नवे पोलीस आयुक्त म्हणून मुंबई येथील विशेष महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा विभागाचे उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांना विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली.
नाशिक : पोलीस आयुक्तालयाचे बहुचर्चित पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची अखेर राज्य शासनाच्या गृह विभागाने मुंबईत बदली केली आहे. काही दिवसांपूर्वीच पाण्डेय यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना विनंती बदलीकरिता अर्ज केला होता. त्यांच्या रिक्त पदावर नवे पोलीस आयुक्त म्हणून मुंबई येथील विशेष महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा विभागाचे उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांना विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली.
राज्य शासनाच्या गृह विभागाने बुधवारी (दि. २०) राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील २८ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने पदस्थापनेचे आदेश जारी केले. यामध्ये बहुचर्चित दीपक पाण्डेय यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांची मुंबईतील महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल-भूमाफिया यांच्या लागेबांधेबाबत महासंचालक कार्यालयाकडे पाण्डेय यांनी पाठविलेले पत्र माध्यमांमध्ये पोहोचले आणि तेथून त्यांच्याविषयी नाराजीचे वातावरण निर्माण झाले. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही त्यांच्या या पत्राविषयी आक्षेप घेण्यात आला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही नाराजी व्यक्त करत, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर पाण्डेय यांनी पत्रामध्ये मांडलेल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे सांगत, त्याबाबत जर थोरात यांचे मन दुखावले असेल, तर माफीही माध्यमांशी बोलताना मागितली होती. हे पत्र फुटण्याअगोदरच आठवडाभरापूर्वी पाण्डेय यांनी स्वत: विनंती बदलीकरिता अर्ज केला होता. त्यामध्ये त्यांनी साईड ब्रॅन्चमध्ये नियुक्तीला पसंती दर्शविली होती. हा बदली अर्जसुद्धा माध्यमांपर्यंत पोहोचला आणि त्याचीही चर्चा रंगली.
--इन्फो--
अफलातून निर्णय वादाच्या भोवऱ्यात
दीड वर्षापूर्वी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे पाण्डेय यांनी हाती घेतली होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात नाशिक शहराला शिस्त लावण्यासाठी व गुन्हेगारीमुक्त करण्याकरिता विविध अफलातून निर्णय घेतले. त्यापैकी काही निर्णय वादग्रस्तही ठरले आणि ते नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत राहिले. त्यांची ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीमदेखील गाजली. सुरुवातीला पेट्रोलपंप चालकांनी या मोहिमेचे स्वागत करत पाठिंबा दिला; मात्र काही दिवसांपूर्वीच पाण्डेय यांनी ही मोहीम अधिक कडक करण्याची घोषणा केली. यावेळी विना हेल्मेटधारक दुचाकी चालकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोलपंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा माध्यमांशी बोलताना दिला होता. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ पेट्रोलपंप चालकांनी ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातील पेट्रोल विक्री दिवसभर बंद ठेवली होती.
--इन्फो--
भूमाफियांविरुद्ध कठोर भूमिका
गेल्यावर्षी आनंदवलीत झालेल्या भूधारक वृद्धाच्या खुनानंतर शहरातील भूमाफियांची पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी पाण्डेय यांनी कठोर भूमिका घेतली होती. या खुनाचा कट रचणाऱ्या टोळीचा म्होरक्या रम्मी राजपूतसह डझनभर संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. राजपूत याच्यासह भूमाफियांच्या टोळीवर पाण्डेय यांनी थेट मोक्कानुसार कारवाई केली. त्यांच्या या कारवाईने भूमाफियांचे धाबे चांगलेच दणाणले होते.