प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांची उचलबांगडी; कलशपुजनाचा वाद भोवल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 05:54 PM2024-01-03T17:54:04+5:302024-01-03T17:55:14+5:30
शस्त्रक्रियेसाठी पद काढल्याचे स्पष्टीकरण.
नाशिक :यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अक्षता कलश पूजनाचे परिपत्रक काढणारे प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. डॉ. प्रकाश देशमुख यांची त्या जागी नेमणूक करण्यात आली आहे. मात्र केवळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाटील यांच्याच विनंतीनुसार त्यांची जबाबदारी काढली असून त्या घटनेचा या निर्णयाशी कुठलाही संबंध नसल्याचा दावा प्रा. संजीव सोनवणे यांनी केला आहे.
प्रशासनाने विद्यापीठाच्या आवारात शनिवारी अयोध्येतून आलेल्या अक्षता कलश पूजनास परवानगी दिल्यानंतर वाद उद्भवला होता. शुक्रवारी रात्री उशिरा कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनी परिपत्रकाद्वारे या कार्यक्रमाची सुचना देत उपस्थित राहण्याची सूचना केली होती. या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीसह काही विद्यार्थी संघटनांनी विरोध केल्यामुळे कुलगुरु प्रा. सोनवणे हे कार्यालयात असूनही पूजनास आले नव्हते. यानंतर त्या कार्यक्रमाशी विद्यापीठाचा कोणताही संबंध नसल्याचेही जाहीर करण्यात आले होते. मात्र झाल्या प्रकरणामुळे कुलगुरूंसह विद्यापीठाच्या विरोधातील झालेले आंदोलन राज्यात चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पाटील यांची उचलबांगडी झाल्याने याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.
विद्यापीठातील अक्षता पुजन कार्यक्रम पाटील यांना भोवल्याचे बोलले जात असातनाच पाटील यांनी आजारपणामुळे जबाबदारी कमी करावी आणि सुटी द्यावी अशी विनंती केल्यामुळेच त्यांचा पदभार काढल्याचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी कळविले आहे.