उचलबांगडी : इंदिरानगरचा ‘दबंग’ पोलीस अधिकारी नियंत्रण कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 06:39 PM2019-05-15T18:39:42+5:302019-05-15T18:41:14+5:30
या घटनेनंतर नांगरे-पाटील यांनी सहायक आयुक्त वसावे यांना सखोल चौकशीचे आदेश दिले होते. हा चौकशी पुर्ण होताच त्यांनी अनिल पाटील यांची उचलबांगडी करत नियंत्रण कक्षामध्ये नेमणूकीचे आदेश त्यांनी दिले.
नाशिक : पोलीस ठाणे हद्दीतील एक शाकाहारी ढाबा रात्रीच्या सुमारास बळजबरीने बंद करताना पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पाटील यांनी ‘दबंगगिरी’ केल्याचा धक्कादायक प्रकार मागील महिन्यात उघडकीस आला होता. ढाब्यावर तत्काळ पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील पोहचल्याने ग्राहकांनी त्यांच्याकडे गा-हाणे मांडत पोलीस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर नांगरे-पाटील यांनी सहायक आयुक्त वसावे यांना सखोल चौकशीचे आदेश दिले होते. हा चौकशी पुर्ण होताच त्यांनी अनिल पाटील यांची उचलबांगडी करत नियंत्रण कक्षामध्ये नेमणूकीचे आदेश त्यांनी दिले.
एप्रिल महिन्यात शनिवारी (दि.२७) आयुक्तालय हद्दीत मिशन आॅल आउट, कोम्बिंग आॅपरेशन रात्री राबविले जात होते. गस्तीवर असताना, त्यांना येथील एक शाकाहारी ढाबा सुरू असल्याचे लक्षात आले. यावेळी ढाबाचालकास ढाबा तासाभरात बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या व पथक पुढे रवाना झाले; मात्र तासाभरानंतरही ढाबा सुरूच असल्याचे पथकाला पुन्हा आढळून आले. यावेळी पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्राहकांना बळजबरीने बाहेर काढण्यास सुरुवात केली. यावेळी काही वकील व त्यांचे कुटुंबीय होते. यावेळी अधिकारी मद्याच्या नशेत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस वाहनाला घेराव घालत रोखून अधिका-याला त्याच ठिकाणी रोखून धरले. ‘त्या’ पोलीस अधिका-याने सोडलेल्या फर्मानानंतर वाहनातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ढाब्यामध्ये प्रवेश करून खुर्च्यांची उलथापालट करत ग्राहकांना धक्काबुक्कीदेखील केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी नांगरे-पाटील यांना सांगितले होते.