दहीवाडी येथील ट्रान्सफॉर्मर दोन महिन्यांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:18 AM2021-09-05T04:18:19+5:302021-09-05T04:18:19+5:30
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील दहीवाडी येथील ट्रान्सफाॅर्मर (वीज रोहित्र) दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील दहीवाडी येथील ट्रान्सफाॅर्मर (वीज रोहित्र) दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके अडचणीत सापडली आहेत. काही प्रमाणात वीज बिल भरूनही ट्रान्सफॉर्मर बसविले जात नाही. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत शिवसेनेचे राजेश गडाख यांनी महावितरण अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून व्यथा मांडली. दोन दिवसांत नादुरस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
गडाख यांनी उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार, सचिन पवार यांच्याशी चर्चा केली. मागणीचे निवेदन दिले. प्रगतिशील शेतकरी रामभाऊ गाडे यांनी याबाबत सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. गडाख यांनी शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली. दोन महिने होऊनही ट्रान्सफॉर्मर बसविला जात नाही. अनेकदा मागणी करूनही त्यास दाद मिळत नसल्याने अखेर शेतकरी हतबल झाले होते.
दोन महिन्यांपासून ट्रान्सफॉर्मरची प्रतीक्षा केली जात आहे. ते बसविण्यासाठी शेतकऱ्यांनी एक लाख रुपयांचे बिलही भरले आहे. मात्र, ऑइल मिळत नसल्याने ट्रान्सफाॅर्मर बसविण्याचे काम लांबणीवर पडले होते. मध्यंतरी झालेल्या पावसाने विहिरीच्या पाण्याची गरजही भासली नाही. त्यानंतर दुरुस्त झालेले ट्रान्सफॉर्मर अन्य गावात बसविण्यात आले आणि दहीवाडी येथील शेतकरी मात्र प्रतीक्षाच करीत राहिले.
अद्यापही जोरदार पाऊस न झाल्याने तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. सुकू लागलेल्या पिकांना विहिरीतील पाण्याचा एकमेव आधार उरला आहे. तथापि, ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने विहिरीतील पाणी देता येत नाही. ट्रान्सफॉर्मर न बसविल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. तो तातडीने बसविण्यात यावा, अशी मागणी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.