मेट्रोच्या निमित्ताने ट्रांझिट आधारित विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 01:21 AM2019-09-25T01:21:45+5:302019-09-25T01:22:02+5:30
देशातील पहिला टायर बेस्ड मेट्रो प्रकल्प शहरात राबवितांना आता त्याच्या कोरीडोरलगतचे पाचशे मीटर क्षेत्रात ट्रांझिट बेस डेव्हलपमेंटचे नियोजन करण्यात आले आहे. याठिकाणी उत्तम सुविधा असलेल्या नियोजनबद्ध वसाहती तयार करण्यात येणार आहे.
नाशिक : देशातील पहिला टायर बेस्ड मेट्रो प्रकल्प शहरात राबवितांना आता त्याच्या कोरीडोरलगतचे पाचशे मीटर क्षेत्रात ट्रांझिट बेस डेव्हलपमेंटचे नियोजन करण्यात आले आहे. याठिकाणी उत्तम सुविधा असलेल्या नियोजनबद्ध वसाहती तयार करण्यात येणार आहे. प्रीमियम आकारून विकासकांना ज्यादा एफएसआय मिळणार आहे. त्यामुळे मेट्रोलादेखील आर्थिक आधार मिळणार आहे. महामेट्रोच्या सल्लागारांनी त्याचा अभ्यास सुरू केला असून, मंगळवारी (दि.२४) महापालिकेसदेखील भेट दिली.
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने नाशिक शहरात महामेट्रोचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नाशिकची मर्यादित लोकसंख्या आणि भौगोलिक स्थिती याचा विचार करून नाशिक शहरासाठी खास टायर बेस्ड मेट्रो बसचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. २१०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाच्या महामेट्रोच्या माध्यमातून राबविला जाणार आहे. त्यासाठी गंगापूर ते नाशिकरोड दरम्याना ३२ किलोमीटरची उन्नत मार्गिका असणार आहे. त्याच्या कोरीडोरमधील पाचशे मीटर क्षेत्रात सध्या ट्रांझिट बेस डेव्हलपमेंट करण्याची महामेट्रोची योजना आहे. कोणतीही शहरी सार्वजनिक वाहतूक तोट्यातच असते. त्यामुळे कोरीडोरपासून पाचशे मीटर अंतरातील क्षेत्राचा विचार केला जाणार आहे आणि तोच महत्त्वाचा भाग असणार आहे. या भागात कॉम्पॅक्ट सिटी उभारण्याची योजना आहे. या क्षेत्रात विकासासाठी ज्यादा एफएसआय देऊन त्या बदल्यात महामेट्रो प्रीमियम आकारेल. त्यामुळे महामेट्रोचा तोटा कमी होऊ शकेल.
महामेट्रोच्या या योजनेत पाचशे मीटर राहणीमान योग्य शहर असावे, अशी योजना आहे. त्यानुसार याठिकाणी नियोजन बद्ध विकास करण्यात येणार आहे. त्यानुसार घरे आणि सायकल ट्रॅक असे सर्व काही कमीत कमी प्रदूषण असणारे असेल आणि त्याच ठिकाणी अनेक सुविधा असतील.
मेट्रोच्या सेवेसाठी कमीत कमी वेळात आणि खासगी वाहनांचा वापर न करता जावे यावे लागणे हा या मागाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
काय आहे टीओडी?
सध्या जगभरात टीओडीची चर्चा आहे. कॉम्पॅक्ट सिटी उभारून ती राहणीयोग्य करणे ही संकल्पना आहे. कॉम्पॅक्ट सिटीमुळे नागरिकांना फारसा प्रवास करावा लागत नाही आणि करायचा म्हटलाच तर नॉन मोटराइज्ड व्हेईकलचा अधिकाधिक वापर असतो.
कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही फायद्यात नव्हे तोट्यातच असते. परंतु ती चालवणे ही गरज असते. त्यामुळे कोरीडोरचा विकास करताना ज्यादा एफएसआय विकून प्रीमियमच्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्याची योजना आहे.
४या क्षेत्रात विकासासाठी ज्यादा एफएसआय देऊन त्या बदल्यात महामेट्रो प्रीमियम आकारेल. त्यामुळे महामेट्रोचा तोटा कमी होऊ शकेल.