नाशिकच्या सिटीलिंकला लागला ब्रेक; ठेकेदाराने वेतन न दिल्याने वाहक संपावर
By संजय पाठक | Published: July 18, 2023 09:03 AM2023-07-18T09:03:17+5:302023-07-18T09:03:38+5:30
नाशिक शहरातील बस सेवा सकाळपासूनच ठप्प झाल्याने शेकडो विद्यार्थी व चाकर मान्यांचे मोठे हाल झाले.
नाशिक : ठेकेदाराने दोन महिन्यांचे वेतन न दिल्याने नाशिक महापालिकेची परिवहन सेवा असलेल्या सिटी लिंकच्या वाहकांनी आज सकाळ पासून काम बंद पुकारले आहे त्यामुळे बस बंद असून विद्यार्थी आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
वाहक पुरवण्याचा ठेका असलेल्या ठेकेदाराने मागील तीन महिन्यांपासून वाहकांना (कंडक्टर) वेतन दिले नाही. त्यामुळे मंगळवारी (दि.18) सकाळी संतप्त झालेल्या शेकडो वाहकांनी (कंडक्टर) संप पुकारल्याने शहरातील बस सेवेला ब्रेक लागला होता. नाशिक शहरातील बस सेवा सकाळपासूनच ठप्प झाल्याने शेकडो विद्यार्थी व चाकर मान्यांचे मोठे हाल झाले. राजकीय पाठबळ असलेल्या ठेकेदाराच्या कारभारामुळे या पूर्वीही अनेकदा वाहकांनी काम बंद केले होते.
संबंधित ठेकेदाराला एप्रिल पर्यंतचे वेतन दिले आहे. मे - जून महिन्याची बिले त्याने दिलेली नाहीत तसेच वाहकांचे पी एफ भरल्याच्या पावत्याही सादर केलेल्या नाहीत. पगार बिले आणि पावत्या सादर न केल्याने सिटी लिंक कडून वेतन देण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असे सिटी लिंकचे महाव्यवस्थापक (वाहतूक) मिलिंद बंड यांनी सांगितले.