एकाच दिवसात सात हजार प्रवाशांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:58+5:302021-07-15T04:11:58+5:30
गेल्या ८ जुलैस महापालिकेची शहर बस वाहतूक सुरू झाली असून, या सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. रविवारपर्यंत प्रवाशांची संख्या ...
गेल्या ८ जुलैस महापालिकेची शहर बस वाहतूक सुरू झाली असून, या सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. रविवारपर्यंत प्रवाशांची संख्या वाढत असली तरी एका दिवसात साडेचार हजार प्रवाशांची वाहतूक करण्यात आली होती. सोमवारी (दि.१२) एकाच दिवसात सात हजार प्रवाशांची वाहतूक करण्यात आली, तसेच १ लाख ५५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आता नागरिक ऑनलाइन पेमेंटचाही वापर करीत असून सोमवारी सुमारे बाराशे रुपये ऑनलाइन तिकिटांव्दारे जमा झाले आहेत.
महापालिकेची सेवा अद्याप नवीन आहे. मोजक्या नऊ मार्गांवर ही सेवा सुरू आहे. सध्या २० सीएनजी आणि सात डिझेल बस सुरू आहेत. लवकरच नागरिकांची गरज लक्षात घेऊन बस आणि मार्ग वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता बी. जी. माळी यांनी दिली.
इन्फो...
नाशिकरोड मार्ग सर्वात फायदेशीर एसटी महामंडळाप्रमाणेच महापालिकेच्या सीटी लिंकलादेखील पंचवटी ते नाशिकरोड हा सर्वाधिक उत्पन्न ठरला आहे. कधीही बस निघाल्यानंतर प्रवासी मिळतातच असा अनुभव आल्याचे कंपनीचे अधिकारी सांगतात. पंचवटी एक्स्प्रेसला कनेक्टिंग बससेवादेखील चांगली ठरली आहे. पंचवटी एक्स्प्रेसला विलंब झाला तरी या रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांना आणल्याशिवाय बस आणू नये, अशा सूचना चालकांना देण्यात आल्या आहेत. महापालिका हद्दीबाहेर सुरू केलेेेल्या भगूरपर्यंतच्या सेेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
इन्फो...
पथकाचा तिसरा डोळा
फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी पंधरा पथकांची निर्मिती करण्यात येत असली तरी सध्या अशा प्रकारच्या पथकातील कर्मचाऱ्यांना बसमधून प्रवास करून एकंदरच सेवा कशी दिली जाते, चालक आणि वाहकांच्या कामकाजाचे निरीक्षण करण्यास सांगण्यात येत आहे. एखाद्या चालकाने बस ओव्हरस्पीड केली किंवा करकचून ब्रेक दाबला किंवा खड्ड्यातून बस नेली तरी त्यासंदर्भात निरीक्षण केले जात आहे.