४६०० झाडांना जाळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:39 PM2020-04-25T23:39:26+5:302020-04-25T23:39:58+5:30
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात विशेष उपक्रम म्हणून सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ओझर ते शिर्डी विमानतळ जोडणाºया राज्य महामार्गावर वावी ते पंचाळे दरम्यान ५ हजार झाडांची लागवड करण्यात आली होती. पैकी सुमारे ४६०० झाडे जगविण्यात वनविभागाला यश आले असून, या झाडांना संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
सिन्नर : गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात विशेष उपक्रम म्हणून सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ओझर ते शिर्डी विमानतळ जोडणाºया राज्य महामार्गावर वावी ते पंचाळे दरम्यान ५ हजार झाडांची लागवड करण्यात आली होती. पैकी सुमारे ४६०० झाडे जगविण्यात वनविभागाला यश आले असून, या झाडांना संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
ओझर आणि शिर्डी विमानतळ जोडणाºया मार्गावर वनविभागाच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत सामाजिक वनीकरण विभागाने विविध प्रकारच्या सावली देणाºया व दीर्घायुषी असणाºया वड, पिंंपळ, चिंंच, कडुलिंंब आदी प्रकारांतील सुमारे पाच हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. या लागवड केलेल्या झाडांची गेले वर्षभर वनमजुरांच्या मदतीने निगा राखण्यात येत आहे.
या झाडांना पाणी कमी पडू नये म्हणून महिन्याकाठी टँकरने पाणी घालून पुरवठा करण्यात येत आहे. योग्य पद्धतीने काळजी घेतली जात असल्याने या झाडांची जोमदार वाढ झाली आहे.
वनमजुरांसमवेत स्थानिक शेतकरी देखील महामार्गाच्या दुतर्फा लागवड केलेल्या या झाडांची काळजी घेत आहेत. वर्षभर काळजी घेतल्यानंतर ५ हजारपैकी ४६०० झाडे जिवंत राहिली. आता वनविभागाकडून या झाडांना संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल सुभाष सांगळे, वनरक्षक दर्शना सौपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात येत आहे. संरक्षक जाळ्या बसविण्यासोबतच अजून पुढची दोन वर्षे वनविभागच या झाडांचे संवर्धन करणार आहे.
गेल्या पावसाळ्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावल्यावर त्यांच्या राखणीचा प्रश्न होता. जनावरांपासून या झाडांना धोका नसला तरी उपद्रवी लोकांकडून मात्र भीती होती. सामाजिक वनीकरण विभागाने रोजंदारी तत्त्वावर मिठसागरे येथील शेतकऱ्यांची मदत घेतली. वनमजूर देखील सोबतीला होते. वनरक्षक सौपुरे यांनी वैयक्तिक लक्ष घालत लागवड केलेल्या झाडांची निगा राखण्यासाठी पुढाकार घेतला. भाऊसाहेब कथले, संदीप कासार, बाबासाहेब कासार, रंगनाथ दिवेकर, हृषिकेश कासार, किरण कासार, संजय जाधव, समाधान कासार, सर्जेराव कासार या शेतकºयांनी या कामात मदत केली.