दळवटला धरपकड

By Admin | Published: June 5, 2017 12:20 AM2017-06-05T00:20:12+5:302017-06-05T00:25:53+5:30

अभोणा पोलिसांनी दळवटच्या त्या युवकांची धरपकड केल्याच्या निषेधार्थ दळवट येथे चौफुलीवर चक्काजाम आंदोलन केले.

Trapped | दळवटला धरपकड

दळवटला धरपकड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : दळवटच्या शेतकरी संपाच्या आंदोलनस्थळी शनिवारी रात्री झालेला लाठीचार्ज, मारहाण व हवेत गोळीबार प्रकरणानंतर रविवारी सकाळी अभोणा पोलिसांनी दळवटच्या त्या युवकांची धरपकड केल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी दळवट येथे चौफुलीवर चक्काजाम आंदोलन केले.
संप काळात शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे ही प्रमुख मागणी केल्यानंतर अभोणा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांची तत्काळ सुटका केल्याने रास्ता रोको मागे घेण्यात येऊन भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
शेतकरी संपाच्या निमित्ताने दळवट आंदोलनाचे केंद्र झाल्याने सलग तीन दिवस आदिवासी शेतकरी बांधवांनी गुजरातकडे जाणारी शेतमालाची व भाजीपाला वाहतूक रोखली. शनिवारी रात्री अभोणा पोलीसांनी आदीवासी आंदोलकांवर लाठीचार्ज , हवेत गोळीबार करुन जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. रविवारी दळवट गावात पोलीसांनी आदीवासी युवकांची धरपकड सुरु केली. यामुळे दळवट व परिसरातील गावातील ग्रामस्थांनी पोलीसांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली . दळवट परिसरातील आदीवासी जनतेने जियश्री पवार व नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरुन दळवट चौफुलीवर वाहतूक रोखून धरत जो पर्यंत ताब्यात घेतलेल्या आदीवासी युवकांची पोलीस सुटका करणार नाही तोपर्यंत रस्ता रोको आंदोलन मागे घेणारी नाही ही भूमिका घेतल्यामुळे आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसू लागल्याने प्रशासनाने सावध पावले उचलली. ताब्यात घेतलेल्या युवकांची सुटका केली. परंतु जमावावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे समजते.
दरम्यान आंदोलन स्थळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, उपसभापती डी एम गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, सोमनाथ सोनवणे, राजू पवार माजी सभापती मधुकर जाधव यांनी धाव घेऊन भाजप सरकारवर जोरदार टीका केली . शेतकरी संप आंदोलन काळात कळवण तालुक्यात पोलीसांनी शेतकरी बांधवांवर व युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पोलिस उपअधिक्षक देवीदास पाटील, पोलिस निरीक्षक राहूल फूला उपस्थित होते .
कळवण तालुक्यातून दळवट मार्ग गुजरात राज्याकडे मोठ्या प्रमाणात भाजीपाला व अन्य शेतमालाची वाहतूक होत असून शेतकरी संप काळात वाहतूकदार व वाहन मालक व चालक यांनी शेतकरी संपाची भूमिका समजून घ्यावी व शेतकरी बांधवांना सहकार्य करावे असे आवाहन शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी नेते, शेतकरी बांधवांनी केले आहे.

Web Title: Trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.