गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ; पुण्यासाठी लागता ४०० ऐवजी ५०० रुपये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:19 AM2021-09-16T04:19:33+5:302021-09-16T04:19:33+5:30
नाशिक : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे शहरातून पुणे, मुंबई, नागपूर अमरावती, धुळे, जळगाव, औरंगाबाद, कोल्हापूरसारख्या विविध जिल्ह्यांमध्ये ट्रॅव्हल्स बसने ...
नाशिक : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे शहरातून पुणे, मुंबई, नागपूर अमरावती, धुळे, जळगाव, औरंगाबाद, कोल्हापूरसारख्या विविध जिल्ह्यांमध्ये ट्रॅव्हल्स बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. त्यातच आता गणेशोत्सव व गौरींच्या निमित्ताने माहेरवाशिणींचीही ट्रॅव्हल्सच्या प्रवाशांमध्ये भर पडली आहे. त्यामुळे प्रवासी वाढल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांनी ट्रॅव्हल्स बसेसची भाडेवाढ केल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. मात्र अनलॉक झाल्यानंतरही अद्याप ट्रॅव्हल्सचा व्यवसाय पूर्णपणे सावरलेला नसून अजूनही अनेक बस जागेवरच उभ्या आहेत. अशा परिस्थितीत डिझेलच्या वाढत्या किमती आणि व्यावसायिकांकडून खर्च भरून काढण्याचा प्रयत्न होत असल्याने ही दरवाढ करण्यात आल्याची प्रतिक्रिया ट्रॅव्हल्स व्यावसायिकांमधून उमटत आहे.
या मार्गावर ट्रॅव्हल्सची भाडेवाढ (बॉक्स)
मार्ग - आधीचे भाडे - आता
नाशिक - मुंबई - ५०० - ६००
नाशिक - पुणे - ४०० -५००
नाशिक - नागपूर - १००० - १२००
नाशिक - कोल्हापूर - ६०० - ६५०
--
दोन वर्षानंतर बरे दिवस कोरोनाकाळात अनेक शहरांसाठी नाशिकमधून खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बस बंद करण्यात आल्या होत्या. नंतरच्या काळात नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबादसारख्या शहरांसाठी मर्यादित बस सुरू करण्यात आल्या असून, आता हे प्रमाण दुपटीहून अधिक वाढले आहे. मात्र, गणेशोत्सवामुळे प्रवासीही वाढल्याने या बसही अपुऱ्या पडताना दिसून येत आहे.
--
सणासुदीमुळे तात्पुरती भाडेवाढ
कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून प्रवासी वाहतूक व्यवसाय मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करीत आहे. आता निर्बंध शिथिल झाल्यामुळे तसेच काही प्रमाणात प्रवासी वाढले असले तरी अजूनही ५० टक्क्यांहून अधिक गाड्या जागेरच उभ्या आहेत. ज्या बस सुरू आहेत त्यांचे डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढ करण्याशिवाय व्यावसायिकांसमोर कोणताही पर्याय नाही. असे असतानाही यावेळी झालेली भाडेवाढ ही तीन ते चार दिवसांपुरतीच मर्यादित होती.
- सदाशिव शेट्टी, ट्रॅव्हल व्यावसायिक
कोट-
प्रवाशांना फटका
मुंबई - नाशिक प्रवासासाठी यापूर्वी पाचशे रुपये आकारले जात होते. मात्र यावेळी थेट सहाशे रुपये भाडे आकारण्यात आले. अचानक व्यावसायिकांनी भाडेवाढ केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना आरामदायी प्रवास करणे कठीण झाले आहे.
- किरण टिळे, प्रवासी
---
पुणे - नाशिक प्रवासाठी यापूर्वी चारशे ते साडेचारशे रुपये भाडे आकारले जात होते. परंतु, यावेळी गणपतीसाठी घरी परतताना पाचशे रुपये भाडे आकारण्यात आले. सणामुळे तीन-चार दिवस असेच वाढीव भाडे द्यावे लागेल, असे प्रवासी वाहतूकदारांकडून सांगण्यात आले.
- सागर ढेरिंग, प्रवासी