ख्रिस्ती बांधवांनी काढली शांती यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:48 AM2018-03-26T00:48:19+5:302018-03-26T00:48:19+5:30
: नाशिकरोड येथील संत फिलीप चर्चतर्फे रविवारी (दि. २५) शांती पदयात्रा काढण्यात आली. गुड फ्रायडेच्या दिवशी येशुला वधस्तंभावर खिळे ठोकून मारण्यात आले.
नाशिकरोड : नाशिकरोड येथील संत फिलीप चर्चतर्फे रविवारी (दि. २५) शांती पदयात्रा काढण्यात आली. गुड फ्रायडेच्या दिवशी येशुला वधस्तंभावर खिळे ठोकून मारण्यात आले. त्याआधी शांतीदूत येशूने पाम वृक्षाची फांदी हातात घेऊन ‘होसान्ना-होसान्ना’ म्हणजेच तुम्हाला शांती असो, असे म्हणत येरूशलेम नगरीत प्रवेश केला. तो दिवस म्हणजे पाम संडे म्हणून ओळखला जातो. बिशप लुर्ड्स डॅनियल यांनी भाविकांना यावेळी मार्गदर्शन केले. जगाला शांतता, मैत्री आणि प्रेमाचा संदेश मिळावा म्हणून काढलेल्या शांतीयात्रेत शेकडो ख्रिती बांधव सहभागी झाले होते. सायंकाळी सेंट झेवियर शाळेतील बाल येशू देवालयातून प्रारंभ झाला. देवालयाचे प्रमुख फादर ट्रिव्हर मिरांडा, फादर राबर्ट पेन, फादर संतांन राड्रिक्स, फादर रवि त्रिभुवन, रेव्ह. प्रवीण घुगे, चर्चचे सचिव सायमन भंजारे, रूपेश निकाळजे, फ्रान्सिस वाघमारे, प्रदीप जाधव, सुभाष श्रीसुंदर, अतुल घोरपडे, बेंजामिन निकाळजे, राहुल साठे, संजय अहिरे, सुहास गंगोदक, सचिन साबळे, दिनेश दास, मंदा घुले उपस्थितीत होते. यात्रेत सुमारे भाविक हातात पाम वृक्षाची डहाळी घेऊन सहभागी झाले होते. शांती यात्रेत बांधव पांढरे शुभ्र वस्त्र घालून हातात पांढरे झेंडे, पाम वृक्षाची डहाळी घेऊन सहभागी झाले होते. ‘होसान्ना-होसान्ना’ प्रभूच्या नावाने गौरव गिते गात होते. शांती यात्रा मुक्तिधाम रोडवरील चर्चपासून सुरू होवून बिटको, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मिना बाजार आदी परिसरातून काढण्यात आली.
पदयात्रा जेलरोडच्या संत आन्ना कॅथिड्रलमध्ये आली. विश्वशांतीसाठी प्रार्थना झाली. बिशप लुर्ड्स डॅनियल म्हणाले की, जगात शांतता, समता, बंधूता यावी यासाठी येशूने जीवन व्यतित केले. येशू लोकांच्या हृदयात येतो. त्याचे विश्वासाने स्वागत करा, येशूला संपूर्ण मानवजातीचा उद्धार करायचा होता. त्याला लोकांना सत्तेच्या नव्हे तर पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करायचे होते. त्यासाठी त्याने योगदान दिले. येशू परमेश्वराचा मार्ग दाखवतो. हा मार्ग खडतर असला तरी त्यातूनच शांती मिळते.