दुर्लक्षितांच्या वेदनांवर उपचारांची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:57 AM2018-07-01T00:57:03+5:302018-07-01T00:57:21+5:30

डॉक्टर-रुग्ण यांच्या नातेसंबंधाबाबत वारंवार चर्चा होते. सकारात्मक-नकारात्मक असे या चर्चेचे पैलू असतात. बहुतांश डॉक्टर आपल्या व्यवसायाची पायरी ओलांडून सामाजिक संवेदनांच्या जाणिवेतून दुर्लक्षित घटकांमधील रुग्णांपर्यंत पोहचून त्यांच्या वेदनांवर फुंकर घालतात आणि आरोग्यसेवेचे व्रत जोपासण्याचा प्रयत्न करतात. यामुळे डॉक्टर-रुग्ण यांच्यामधील नात्याची वीण घट्ट होण्यास निश्चितच मदत होत आहे.

Treatment of anemia pain | दुर्लक्षितांच्या वेदनांवर उपचारांची फुंकर

दुर्लक्षितांच्या वेदनांवर उपचारांची फुंकर

Next

नाशिक : डॉक्टर-रुग्ण यांच्या नातेसंबंधाबाबत वारंवार चर्चा होते. सकारात्मक-नकारात्मक असे या चर्चेचे पैलू असतात. बहुतांश डॉक्टर आपल्या व्यवसायाची पायरी ओलांडून सामाजिक संवेदनांच्या जाणिवेतून दुर्लक्षित घटकांमधील रुग्णांपर्यंत पोहचून त्यांच्या वेदनांवर फुंकर घालतात आणि आरोग्यसेवेचे व्रत जोपासण्याचा प्रयत्न करतात. यामुळे डॉक्टर-रुग्ण यांच्यामधील नात्याची वीण घट्ट होण्यास निश्चितच मदत होत आहे.  शहरातील डॉक्टरांची मुख्य संघटना आयएमए असो किंवा या संघटनेचे काही सदस्य असो तसेच बालरोगतज्ज्ञ अथवा नेत्र, दंतरोग तज्ज्ञदेखील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये महिला, मुले, पुरुषांसह ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर आजारांचे निदान करत मोफत वैद्यकीय सेवा पुरविताना दिसून येतात. कुपोषणाची मोठी गंभीर समस्या आदिवासी भागातील मुलांमध्ये वाढीस लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपले सामाजिक कर्तव्य म्हणून शहरातील सोशल नेटवर्किंग फोरमच्या पुढाकाराने बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेचे १६ डॉक्टरांनी कुपोषित मुलांसाठी तीन महिने विशेष मोहीम हाती घेतली होती.
या मोहिमेसाठी आयएमए तसेच केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनकडूनही मदत लाभली. एकूण ३५३ बालकांची या मोहिमेअंतर्गत बालरोग तज्ज्ञांनी तपासणी करुन योग्य आहार, औषधोपचार तीन महिन्यांसाठी पुरविण्यात आला. यावेळी दंड घेर, डोक्याचा घेर या परिमाणांऐवजी बालकांचे वजन वाढविण्याच्या निकषावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात आला.  तसेच रोटरी इनरव्हील क्लब जेननेक्स्टच्या माध्यमातून शहरातील गरजू व विशेष मुलांच्या शाळांना भेट देत त्यांच्या मौखिक आरोग्याची तपासणी व दंतव्यंग तपासणी निदान उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत शहरातील २२ शाळांमधील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांची डॉ. मीनल पलोड यांच्यामार्फत मोफत दंत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, ७५ मुलांना पलोड यांनी त्यांच्या दवाखान्यातून मोफत औषधोपचार उपलब्ध क रून दिला.
आदिवासी भागासाठी कल्पतरूचे ‘व्हिजन’
शहरामधील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शरद पाटील यांनी २००० साली कल्पतरू फाउण्डेशनची स्थापना के ली. त्यामाध्यमातून आदिवासी तालुक्यातील गाव, वाडे-वस्तीवर जाऊन तेथील लोकांच्या डोळ्यांची तपासणीला प्रारंभ केला. काही वर्षांपूर्वी पिंपळगाव बसवंत, अभोणा व गुजरातमधील डांग जिल्ह्यातही या फाउण्डेशनकडून व्हिजन केंद्र सुरू करण्यात आले. या फाउण्डेशनच्या माध्यमातून आदिवासींच्या नेत्ररोग निवारणाचा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला जात आहे.
आरोग्य जागृतीचे ‘जगदिशा’चे व्रत
डॉ. जगदीश कुलकर्णी मेमोरियल जगदिशा फाउण्डेशनच्या वतीने किशोरावस्थेतील मुलांमध्ये तसेच त्यांच्या पालकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न मागील १८ वर्षांपासून केला जात आहे. व्यसनाधिनता व दुष्परिणामांसह स्तनपानाबाबतचे चुकीचे गैरसमज व पद्धती अशा विविध विषयांवर डॉ. शामा कुलकर्णी व त्यांचे चिरंजीव डॉ. केयूर कुलकर्णी मोफत कार्यशाळांची मोहीम यशस्वीपणे राबवित आहे. दिवंगत दंतरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश कुलकर्णी यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेत फाउण्डेशन जनसामान्यांमध्ये आरोग्यविषयक ज्ञानाचा प्रसार करत आहे. आतापर्यंत संस्थेच्या वतीने दीड हजाराहूंन अधिक मोफत ‘पालक शाळे’चे वर्ग भरविण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: Treatment of anemia pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.