डॉक्टरांना दिलासा : होमिओपॅथीसाठी आता पार्टटाइम
By admin | Published: September 11, 2015 12:58 AM2015-09-11T00:58:12+5:302015-09-11T00:58:34+5:30
‘फार्माकोलॉजी’होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीचा मार्ग मोकळा
नाशिक : होमिओपॅथीची प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांना अॅलोपॅथीची औषधे वापरण्याबाबत तयार करण्यात आलेला ‘फार्माकोलॉजी’ हा अभ्यासक्रम अखेर अंशकालीन करण्याचा निर्णय आरोग्य विद्यापीठाने घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून यासाठी होमिओपॅथी डॉक्टर्स संघटनेच्या वतीने प्रयत्न सुरू होते. या निर्णयामुळे राज्यातील ६१ हजार होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.
होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची औषधे वापरण्याची परवानगी मिळावी यासाठी गेल्या ३४ वर्षांपासून लढा सुरू होता. याप्रकरणी संघटनेचे नेते डॉ. अरुण भस्मे यांनी नागपूर अधिवेशनकाळात बारा दिवस उपोषणही केले होते. १३ आॅगस्ट २०१४ रोजी शासनाने एक अद्यादेश काढून होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची परवानगी देताना एक समिती नियुक्त केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार होमिओपॅथी डॉक्टारांना एकवर्ष मुदतीचा ३०० तासांचा ‘ फार्माकोलॉजी’ अभ्यासक्रम शिकण्याची सक्ती करण्यात आली होती. सदर अभ्यासक्रम राबविण्याची आणि परीक्षेची जबाबदारी शासनाने आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सोपविली होती;
परंतु विद्यापीठाने ३०० तासांच्या अंशकालीन अभ्यासक्रमाऐवजी २१०० तासांचा दीर्घ आणि पूर्णवेळ अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने त्यास होमिओपॅथी डॉक्टरांनी विरोध केला होता. दीर्घ मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि त्यासाठी वेळ द्यावा लागणार असल्याने डॉक्टरांची नियमित प्रॅक्टीस बंद होण्याचा धोका तसेच अभ्यासक्रमाला प्रतिसाद न मिळण्याची बाबही विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर विद्यापीठाने एक समिती गठित केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार विद्यापीठाच्या विद्या परिषदेत अंशकालीन अभ्यासक्रमाचा निर्णय आज जाहीर करण्यात आला.
त्यानुसार आता होमिओपॅथी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांना चार तास प्रॅक्टीकल, चार तास लेक्चर आणि चार तास कॅज्युल्टी विभागात अनुभव घ्यावा लागणार आहे. आठवड्यातून दोन दिवस हा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. एक वर्ष मुदतीतील हा अभ्यासक्रम सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधून शिकविला जाणार असून, येत्या काही दिवसांत यात आणखी काही महाविद्यालयांचा समावेश होणार आहे, तर जे विद्यार्थी होमिओपॅथी शिकत आहेत आहेत, त्यांच्या अभ्यासक्रमातच ‘फार्माकोलॉजी’ अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे. नोव्हेंबरपासून फार्माकोलॉजीसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे समजते.