लम्पी रोगग्रस्त जनावरांचे उपचार वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:15 AM2021-09-11T04:15:46+5:302021-09-11T04:15:46+5:30

त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यातील जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली असून, या रोगाचे लसीकरण अथवा जनावरांवर उपचार करणारे तालुका पशुधन ...

Treatment of lumpy diseased animals in the air | लम्पी रोगग्रस्त जनावरांचे उपचार वाऱ्यावर

लम्पी रोगग्रस्त जनावरांचे उपचार वाऱ्यावर

Next

त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यातील जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली असून, या रोगाचे लसीकरण अथवा जनावरांवर उपचार करणारे तालुका पशुधन वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने जनावरांवर उपचार केले जात नसल्याची खंत तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तालुका पशुधन वैद्यकीय अधिकारी देवस्थानच्या दौऱ्यावर गेल्याचे कळते, तर इतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करावा तर फोन उचलला जात नाही आणि जनावरांची परिस्थिती पाहून उपचार करण्यासाठी वारंवार फोन केल्यानंतर तिरसटपणे अहो आमची मीटिंग चालू आहे, असे उत्तर देत काही बोलण्यापूर्वीच फोन कट केला जातो.

त्र्यंबकेश्वर शहरात विस्तीर्ण जागेत सुसज्ज अशा कार्यालयासह जनावरांचा दवाखाना वजा उपचार केंद्र आहे. हा दवाखाना असून नसल्यासारखाच आहे. कार्यालयासाठी पंचायत समिती पेगलवाडी, अंजनेरी अशा ठिकाणी जागा शोधत असताना पशुउपचार केंद्रासाठी विस्तीर्ण जागा असताना दवाखान्यात सहसा कोणी थांबत नाहीत. जनावरांवर उपचार करणे तर दूरच राहिले! येथील डाॅक्टर्स कायम त्र्यंबक पंचायत समिती कार्यालयात असतात. जनावरांच्या दवाखान्यात तर कोणीच नसते. आज संपूर्ण तालुक्यात लम्पीरोगाने जनावरे ग्रस्त असताना जनावर मालक चिंतातुर झाले आहेत. जनावरांकरिता लागणारी औषधे खासगी दवाखान्यातून मिळत नाहीत. ती औषधे फक्त सरकारी पशुवैद्यकीय उपचार केंद्रातच आहे. दरम्यान, सरकारी पशुवैद्यकीय उपचार केंद्रात लस उपलब्ध आहे, तर डाॅक्टर्स नसतात. खासगीतून घ्यावी म्हटले तर आमच्याकडे उपलब्ध नाही, असे सांगितले जाते. अशा कात्रीत शेतकरी अडकले आहेत. एकीकडे लम्पीरोग बळावत असताना जनावरांवर उपचार कोण करणार? जनावरांच्या या रोगावर उपचार होणे गरजेचे असल्याचे जनावर मालक बोलत आहे, तर जनावरांचा उपचार करण्यास पशुवैद्यकीय अधिकारी मात्र हलगर्जीपणा करीत असल्याने त्रस्त शेतकरी व जनावरांच्या मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हवे तर औषधाचे पैसे घ्या; पण उपचार करा! मी गेल्या काही दिवसांपासून येथील तालुका पशुधनविकास अधिकारी शिंदे साहेबांना विनंती करीत आहे. आज येतो, उद्या येतो, थोड्या वेळात येतो, असे ते म्हणत. मात्र, आता तर ते फोनही उचलत नाहीत. यासंदर्भात बीडीओ साहेबांना सांगितले असता त्यांनी सांगितले की, शिंदे हे राजस्थान दौऱ्यावर गेले आहेत. पैसे देऊन खासगीतून औषध घ्यावे म्हटले, तर बाहेर मिळत नाहीत. खिल्लारी बैलांची अवस्था गलितगात्र झाली आहे.

- सुनील बबनराव अडसरे, मा. नगराध्यक्ष तथा शेतकरी, त्र्यंबकेश्वर

Web Title: Treatment of lumpy diseased animals in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.