कोविड रुग्णालयातील नॉनकोविड रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:24 AM2021-02-06T04:24:44+5:302021-02-06T04:24:44+5:30
गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर सुरुवातीला रुग्णसंख्या मर्यादित हेाती. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात उपचार होत होते. नंतर मात्र ...
गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर सुरुवातीला रुग्णसंख्या मर्यादित हेाती. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात उपचार होत होते. नंतर मात्र संख्या वाढत गेल्यानंतर खासगी रुग्णालयांची गरज भासली. महापालिकेने त्यानुसार खासगी रुग्णालयांमध्ये काही बेडस् आरक्षित केले, तर काही रुग्णालये केवळ कोविड काळातच सुरू करण्यात आली. त्यामुळेच कोरानाच्या संकटकाळात महापालिकेने खासगी आणि शासकीय व निमशासकीय रुग्णालये, अशी एकूण ९३ रुग्णालये मिळून ४ हजार ५४२ बेड उभे केले. त्यामुळे शहरात रुग्णसंख्या वाढत असताना बेडस्ची संख्याही वाढत गेली. पंधरा रुग्णालये केवळ कोविड उपचारांसाठीच सुरू झाल्याने महापालिकेच्या रुग्णालयांवरील ताण हलका झाला. मात्र, ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्या घटत असून, आता महापालिकेने कोविड सेंटर्स बंद केली आहेत; परंतु खासगी रुग्णालयातील आरक्षण मात्र कायम आहे. त्यामुळे अनेक खासगी रुग्णालयांचे बेड रिकामे राहत आहेत. कोविडसाठी सुरू झालेल्या रुग्णालयातील संख्यादेखील कमी झाली असली तरी या रुग्णालयांमधील आरक्षण शासनाने हटविलेले नाही आणि खास कोविडसाठी सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयांनादेखील नॉनकोविड रुग्णालये करण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र, असे असले तरी खास कोेविडसाठी सुरू झालेल्या अनेक रुग्णालयांत नॉनकोविड रुग्णांवर उपचार सुरू झाल्याच्या तक्रारी असून, त्यामुळेच त्यांची तपासणी करून कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.