वाढत्या संसर्गावर केला गावोगावी संस्थात्मक विलगीकरणाचा इलाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 10:59 PM2021-06-08T22:59:44+5:302021-06-08T23:00:24+5:30
आमदारांचा लेखाजोखा... देवळा देवळा : कोरोनाच्या पहिल्या लाटेला यशस्वीपणे तोंड देत तालुका कोरोनामुक्त झाला. त्यानंतर नागरिकांनी कोरोना गेल्याच्या उत्साहात ...
आमदारांचा लेखाजोखा... देवळा
देवळा : कोरोनाच्या पहिल्या लाटेला यशस्वीपणे तोंड देत तालुका कोरोनामुक्त झाला. त्यानंतर नागरिकांनी कोरोना गेल्याच्या उत्साहात दाखविलेली बेफिकिरी चांगलीच अंगलट आली. अशावेळी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी वाढत्या संसर्गावर गावोगावी संस्थात्मक विलगीकरणाचा इलाज करीत व स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार वैद्यकीय साहित्याची उपलब्धता करीत रुग्णसंख्या आटोक्यात आणली. त्यामुळे सुरुवातीला दररोज शंभरी पार करणारी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता दहाच्या आत आल्याचे चित्र नागरिकांना दिलासा देणारे आहे.
देवळा, दहिवड, मेशी, लोहोणेर, उमराणे, गुंजाळनगर, कनकापूर या गावांत मार्च महिन्यात सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या व होम क्वॉँरंटाइन केलेल्या अनेक व्यक्तींकडून नियमांचे होणारे उल्लंघन व गावागावांत त्यांच्या मुक्त संचारामुळे कोरोनाचा संसर्ग सर्वत्र वेगाने फैलावत असल्याचे निदर्शन आले. आल्यानंतर गावागावात संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले. आमदार डॉ. आहेर यांनी स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार तेथे औषधे तसेच इतर साहित्य उपलब्ध करून दिले. देवळा तालुक्यात खामखेडा, खर्डा, दहीवड, लोहाणेर, मेशी येथील आरोग्य केंद्र तसेच देवळा व उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयात संशयित रुग्णांना अँटिजन तसेच आर्टिफिशियल टेस्टची तसेच कोविड लसीकरण करण्याची सुविधा सुरू असून, लसींच्या उपलब्धतेनुसार आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात लसींचे समप्रमाणात वाटप करण्यात येऊन नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
आमदार डॉ. आहेर यांनी खासदार भारती पवार यांच्यासह नुकतीच तालुक्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांची बैठक घेऊन तालुक्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या, बरे झालेले रुग्ण, ऑक्सिजनची उपलब्धता तसेच आतापर्यंत झालेल्या कोविड लसीकरणाबाबतची माहिती त्यांनी घेतली. आदिवासी समाजात कोरोना चाचणी व लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आमदार निधीमधून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन घेण्यासाठी १२.६५ लाख रुपये व बिपॅप मशीन घेण्यासाठी ७.२० लाख रुपये दिले आहेत. आमदारांच्या प्रयत्नातून देवळा ग्रामीण रुग्णालय येथे २० ऑक्सिजन बेड व उमराणे ग्रामीण रुग्णालय येथे ३० ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आल्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे.
तालुक्यातील नागरिकांचे लसीकरण वेगाने व्हावे यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांची भेट घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात लसीकरण करण्याऐवजी गावोगावी जाऊन लसीकरण करण्याची मागणी त्यांनी केली. रेमडेसिविरचा तुटवडा असताना फार्मा एजन्सींच्या व रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयांतील डॉक्टरांच्या संपर्कात राहून अनेक कोरोना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले.
ऑक्सिजन तुटवड्यावर पर्याय
ऑक्सिजनचा तुटवडा असताना जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संपर्कात राहून तालुक्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर भरून घेतले. बहुतांश वेळा ऑक्सिजन कंपनीच्या मालकांचा सतत पाठपुरावा करून जास्तीत जास्त ऑक्सिजन सिलिंडर तालुक्यासाठी भरून मिळावेत यासाठी प्रयत्न केले. तसेच नाशिकमधील खासगी डॉक्टरांसह जिल्हाधिकारी मांढरे यांच्यासमवेत बैठका घेऊन कोरोना उपाययोजनांबाबत भूमिका मांडली. तालुक्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत ग्रामीण रुग्णालय देवळा व उमराणे येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर करून घेतले.
ऑक्सिजन प्लांट - २
देवळा ऑक्सिजन बेड - २०
उमराणे ऑक्सिजन बेड - ३०
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी - १२.६५ लाख
बिपॅप मशीनसाठी - ७.२० लाख
कोरोनाकाळात ग्रामीण भागातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा रुग्णालय नाशिक येथील सर्व ७५० बेड कोविड रुग्णांसाठी राखीव करावे व नॉनकोविड रुग्णांसाठी संदर्भ सेवा रुग्णालयात व्यवस्था करावी, अशी आग्रही भूमिका मांडली. त्याचाच परिपाक म्हणून जिल्हा रुग्णालयात १५० अतिरिक्त बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले.
- डॉ. राहुल आहेर, आमदार, देवळा-चांदवड
फोटो - ०८ देवळा एमएलए