झाडावर चढण्याची नोकरी; पगार मिळणार अडीच लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 05:45 PM2023-06-15T17:45:23+5:302023-06-15T17:45:59+5:30

होय! तुम्ही वाचलेले शीर्षक अगदी योग्य आहे.

tree climbing job Salary will be 2.5 lakh rupees | झाडावर चढण्याची नोकरी; पगार मिळणार अडीच लाख रुपये

झाडावर चढण्याची नोकरी; पगार मिळणार अडीच लाख रुपये

googlenewsNext

पंकज जोशी

नाशिक - होय! तुम्ही वाचलेले शीर्षक अगदी योग्य आहे. झाडावर चढण्याचीच ही नोकरी आहे आणि त्यासाठी चांगला पगारही दिला जाणार आहे. पण ज्या झाडावर चढायचं आहे, ते झाड मात्र उंच आहे बरं का...म्हणजे कल्पवृक्ष समजलं जाणारं आपल्या कोकणातील नारळाचं झाड आणि नोकरी देणारेही कोकणातीलच कृषी उद्योजक आहे.

सध्या सोशल मीडियाच्या काही ग्रूपवर एक नोकरीची जाहिरात फिरत आहे. त्यातील मजकूर कुणाचंही लक्ष चटकन वेधून घेणारा आहे. त्यात लिहिलंय ‘कोकोनट ट्री कमांडो’ नियुक्त करणे आहे. शिक्षण अनुभवाची अट नाही. मात्र उमेदवाराला नारळाच्या झाडावर चढता येणे आवश्यक आहे. मात्र ज्यांना चढता येत नसेल, त्यांना रितसर प्रशिक्षण दिले जाईल असेही जाहिरातीत म्हटलंय. रत्नागिरीतील तरुण कृषी उद्योजक तुषार आग्रे यांनी ही अनोखी जाहिरात दिलीय.

‘कोकणात नारळाच्या बागा खूप आहेत. याशिवाय काही हौशी मंडळी आपल्या घराभोवती नारळाची झाडे लावताना दिसतात. पण नारळाची हवी तशी देखभाल केली जात नाही. याशिवाय नारळ जेव्हा उंच वाढतो, तेव्हा त्यावरून नारळ कसे खाली उतरावयाचे असाही प्रश्न असतो. त्यासाठी बागायतदार शेतकऱ्यांना किंवा परसबागेची आवड असलेल्यांना शोधाशोध करावी लागते. हीच गरज हेरून आम्ही नारळाच्या बागेची देखभाल करण्याचा आणि नारळ उतरविण्याची सेवा सुरू केली, मेकॅनिकल इंजिनिअर असलेले तुषार आग्रे सांगतात. 

पूर्वीसारखी नारळाच्या झाडावर चढणारी माणसे आता मिळत नाहीत. त्यामुळं आग्रे आणि त्यांचे सहकारी झाडावरून आधुनिक शिडीच्या साह्याने झाडावरचे नारळ उतरवून देणे, तसेच नारळाच्या झाडाची मशागतीपासून तर कीड-नियंत्रणापर्यंतची सर्व देखभाल करण्याची सेवा आपल्या स्वराज्य नावाच्या संस्थेमार्फत प्रदान करतात. त्यातून अनेकांना रोजगारही मिळाला आहे.
‘कोकणातील नारळाची झाडे ही सरळसोट नाहीत. त्यावर चढण्यासाठी ‘आॅटोमॅटिक क्लाय्बिंग’ यंत्राचा उपयोग होत नाही. म्हणून आम्ही इथं आधुनिक पण मानवी पद्धतीनं हाताळता येईल अशी शिडी वापरतो. त्यासाठी होतकरूंना प्रशिक्षणही देतो. आमच्या सेवेविषयी अनेकांना माहिती झाल्याने आमचे कामही वाढत आहे. त्यातून भविष्यात एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात नारळ झाडावर चढून उतरविणाऱ्या 200 जणांना रोजगार मिळू शकतो’,असा विश्वास तुषार यांना वाटतो.

आंग्रे यांनी दिलेल्या जाहिरातीनुसार योग्य कुशल व्यक्तीला वर्षाला सुमारे अडीच लाखांपर्यंत पगार दिला जाणार आहे, शिवाय त्याच्या सुरक्षिततेसाठी विमाही 5 लाखांचा विमा आणि मेडिक्लेमची दिला जाणार आहे. नारळाचे झाड हे कल्पवृक्ष समजले जाते. त्याच्या पानांपासून ते फळापर्यंत प्रत्येक भागाचा वापर कसा करता येईल आणि त्यातून रोजगार निर्मिती व शेतकऱ्यांचे सक्षमीकरण कसे होईल? यासाठी तुषार आग्रे आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील असतात. त्यांच्या प्रयत्नांना आता यशही मिळत आहे आणि रोजगारनिर्मितीही होत आहे.

Web Title: tree climbing job Salary will be 2.5 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.