पंचवटी भागात वृक्ष कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:18 AM2019-07-30T01:18:11+5:302019-07-30T01:18:45+5:30
गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झाडांचे बुंधे भिजल्याने वृक्षांची पडझड सुरू झाली आहे. पंचवटीत पेठरोडवर सोमवारी सकाळी करंज वृक्ष कोसळला, तर दुपारी प्राचीन सीतागुंफा संस्थानजवळ वटवृक्षाची एक फांदी पत्र्यावर वाकली. सुदैवाने या दोन्ही घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पंचवटी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झाडांचे बुंधे भिजल्याने वृक्षांची पडझड सुरू झाली आहे. पंचवटीत पेठरोडवर सोमवारी सकाळी करंज वृक्ष कोसळला, तर दुपारी प्राचीन सीतागुंफा संस्थानजवळ वटवृक्षाची एक फांदी पत्र्यावर वाकली. सुदैवाने या दोन्ही घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. भाविकांना रांगेने उभे राहता यावे यासाठी तयार केलेल्या निवारा शेडवर फांदी आल्याने दुर्घटना टळली.
पंचवटी अग्निशमन दल व उद्यान विभागाच्या वतीने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पेठरोडला वृक्ष, तर सीतागुंफा संस्थानजवळ निवारा शेडवर वाकलेली फांदी बाजू काढण्यात आली. दुपारी घडलेल्या घटनेनंतर सीतागुंफा संस्थांमध्ये काहीकाळ भाविकांना दर्शन बंद केले होते. पेठरोड सिग्नल नजीक करंज वृक्ष असून, सोमवारी सकाळी बुंध्यापासून वृक्ष उन्मळून पडला. सकाळी वर्दळ कमी असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सीतागुंफा संस्थानजवळ असलेल्या वड, पिंपळ वृक्षाच्या फांद्या वाकून निवारा शेडवर आल्याने त्या कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. सदर घटना नागरिकांच्या लक्षात येताच तत्काळ अग्निशमन दल व उद्यान विभागाला माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन व उद्यान विभागाच्या कर्मचारी- अधिकाऱ्यांनी धाव घेत वट व पिंपळाच्या फांद्या बाजूला काढण्याचे काम केले. याच परिसरात वीजतारा असल्याने वाकलेल्या वृक्षाच्या फांद्या काढण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने फांद्या बाजूला काढण्याचे काम केले. वृक्षाच्या वाकलेल्या फांद्या काढण्याचे काम सुरू असताना काहीवेळ रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या घरावर पडले झाड
शहरात रविवारी (दि.२८) सहा ठिकाणी झाडे पडली. त्यात जिल्हाधिकाºयांच्या निवासस्थानीदेखील एक झाड पडल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. सोमवारी (दि.२९)देखील सहा झाडे पडलीत त्यात त्र्यंबकरोडवर शासकीय वसतिगृहावरदेखील एक झाड पडले. शहरात धोकेदायक वृक्षांची पडझड सुरूच असून, महापालिकेने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.