पाथरेत वृक्ष संवर्धन पंधरवड्यानिमित्त वृक्ष लागवड
By admin | Published: July 22, 2014 10:12 PM2014-07-22T22:12:53+5:302014-07-23T00:30:31+5:30
पाथरेत वृक्ष संवर्धन पंधरवड्यानिमित्त वृक्ष लागवड
पाथरे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पाथरे येथे वृक्ष संवर्धन पंधरवडा विविध कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. यानिमित्ताने शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत येथे वृक्षलागवड करण्यात आली.
या मोहिमेत प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभागी होणे अपेक्षित असल्याने पाथरे बुद्रूक, पाथरे खुर्द व वारेगाव या ग्रामपंचायतींनी प्रत्येकी ५०० वृक्षांचे रोपण केले आहे. वारेगाव येथे पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेंतर्गत पाचशे वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याने शासनाच्या वतीने असे कार्यक्रम हाती घेण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यापूर्वी पाथरे येथील पाथरे बुद्रूक, पाथरे खुर्द व वारेगाव या ग्रामपंचायतींच्या वतीने सुमारे एक हजार पाचशे वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहितीही याप्रसंगी दिली. उन्हाळ्यातही रोपट्यांची काळजी घेऊन ग्रामपंचायतींच्या वतीने या वृक्षांचे संवर्धन करण्यात आले आहे.
यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने वृक्षांचा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली. येथील तीनही ग्रामपंचायतींच्या वतीने एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वृक्षसंवर्धन कार्यक्रमास पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी एम. के. वाघ, विस्तार अधिकारी एस. के. चौधरी, वारेगावचे ग्रामसेवक विजय मोरे, पाथरे बुद्रूकच्या ग्रामसेवक आशालता चौधरी आदिंनी विविध योजनांची माहिती दिली. यावेळी बाळासाहेब खळदकर, पाथरे रामनाथ चिने, मंदाताई बाविस्कर, गणेश सोमवंंशी, योगेश चिने, राजेंद्र गवळी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित
होते. (वार्ताहर)