नामपूरच्या वैकुंठधामात लोकसहभागातून वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 04:07 PM2019-07-27T16:07:28+5:302019-07-27T16:08:06+5:30
शुभवर्तमान : ग्रामस्थांनी उचलली संवर्धनाची जबाबदारी
नामपूर : शासनासह विविध संस्थांकडून वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात परंतु, त्यात अपवाद वगळता बव्हंशी फोटोसेशनपुरताच पर्यावरण संवर्धनाचा आव आणला जातो. नामपूरकरांनी मात्र लोकसहभागातून वैकुंठधाम स्मशानभूमीत १११ देशी वृक्षांची लागवड करत त्यांच्या संवर्धनाचीही जबाबदारी उचलत एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे.
नामपूरमध्ये वैकुंठधाम सुधार समिती कार्यरत आहे. या समितीच्या सदस्यांनी वैकुंठधामात वृक्षारोपणासाठी सोशलमिडियावर आवाहन केले. वृक्ष व संरक्षक जाळीसह विशिष्ट रक्कमही जाहीर केली आणि अवघ्या १५ मिनिटात १११ वृक्षांचे २४ दाते तयार झालेत. या प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आणि वैकुंठधाम परिसरात सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने १११ वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे सात फूट उंचीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. यात बकुळ, सप्तपर्णी,निंब,वड, कदंब, पिंपळ, कोरडीया इत्यादी जातीच्या वृक्षांचा समावेश आहे. सार्वजनिक निधी गोळा करून झाडे तसेच झाडांना संरक्षणासाठी लागणाऱ्या जाळ्या तसेच संगोपनासाठी पाणी आदी गोष्टींचे नियोजन करण्यात आले. या देशी वृक्षांना नामपूरचे उपक्र मशिल शेतकरी विकीराज सावंत हे स्वखर्चाने पाणी उपलब्ध करून देणार आहेत. तर माऊली सावंत, डी.एल.नेर. विठ्ठल मगजी ,महेश सावंत, माधवराव सावंत आणि भाऊसाहेब सावंत यांनी सप्ताहातून एकदा वृक्षांना पाणी टाकण्याची जबाबदारी घेतली आहे. या उपक्रमाबरोबरच आदर्श चौकातील बहुउद्देशिय आदर्श मंडळानेही चौकात विविध झाडे लावल्याची माहिती मंडळाचे प्रमुख संतोष सावंत यांनी दिली.