छाटणीच्या नावाखाली झाडांचा बिघडतोय ‘तोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:12 AM2021-05-28T04:12:14+5:302021-05-28T04:12:14+5:30

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजवाहिन्यांना फांद्या घासून, दुर्घटना घडू नये आणि वीजपुरवठा खंडित होऊ नये, या उद्देशाने दरवर्षी महावितरणकडून झाडांच्या फांद्या ...

Trees are deteriorating under the name of pruning | छाटणीच्या नावाखाली झाडांचा बिघडतोय ‘तोल’

छाटणीच्या नावाखाली झाडांचा बिघडतोय ‘तोल’

Next

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजवाहिन्यांना फांद्या घासून, दुर्घटना घडू नये आणि वीजपुरवठा खंडित होऊ नये, या उद्देशाने दरवर्षी महावितरणकडून झाडांच्या फांद्या छाटल्या जातात. झाडांची छाटणी करताना केवळ वीजतारांना होणारा अडथळा लक्षात घेतला जातो. मात्र, त्यांची नैसर्गिक रचना आणि शास्त्रीय पद्धतीचा अवलंब छाटणीसाठी केला जात नसल्याने झाडांची नैसर्गिक रचना धोक्यात आली आहे. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात शहरातील डेरेदार वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना अधिक घडत असल्याची टीका पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. शहरात रेन ट्री, काशिद, गुलमोहर, पेल्ट्राफोरम, चोपडी सावर यांच्यासारखी विदेशी झाडे अधिक आहेत. ही झाडे अधिक कमकुवत असतात आणि त्यातच जर त्यांच्या पर्णसंभाराचा तोल बिघडला तर लवकर कोसळतात, असे वृक्ष अभ्यासकांचे म्हणणे आहे. ही बाब वृक्षांची छाटणी करताना अत्यंत महत्त्वाची ठरते. मात्र, याकडे कोणीही लक्ष देत नाही. केवळ झाडांच्या फांद्या छाटून त्यांच्या नैसर्गिक वाढीमध्ये अडथळा निर्माण केला जात असल्याचे आपले पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष, वृक्षप्रेमी शेखर गायकवाड यांनी सांगितले.

---इन्फो--

मनपा उद्यान समितीचाही कानाडोळा

नाशिक शहरातील वृक्षांचे संरक्षण-संवर्धनाची जबाबदारी मनपा प्रशासनावर आहे. शहरातील झाडांची महावितरणकडून अशास्त्रीय पद्धतीने सर्रासपणे दरवर्षी केली जाते. मात्र, याकडे मनपाच्या उद्यान विभागाकडूनही कानाडोळा होतो. झाडांच्या वाढीवर याचा परिणाम तर होतच आहे. मात्र, शहरात पावसाळ्यात झाडे कोसळून नागरिकांच्या वाहनांच्या होणाऱ्या नुकसानीच्या घटनाही घडतात.

---इन्फो---

सोशल मीडियावरही संताप

महावितरण कंपनीने वीजतारा भूमिगत करण्याचा प्रयत्न प्राधान्याने करायला हवा. मात्र, त्यावर महावितरण प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही आणि झाडांच्या फांद्या मात्र सर्रासपणे अशास्त्रीय पद्धतीने दरवर्षी न चुकता तोडल्या जात असल्याच्या चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. शहरातील शरणपूर रोड भागात तोडलेल्या झाडांची छायाचित्रे सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत.

Web Title: Trees are deteriorating under the name of pruning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.