नाशिक शहरातील वृक्षसंपदा ४८ लाखांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:12 PM2018-04-30T17:12:02+5:302018-04-30T17:12:02+5:30
वृक्षगणना : लष्करी हद्दीतील मोजणी प्रलंबित
नाशिक - नाशिक शहर खऱ्या अर्थाने हरित असल्याचे महापालिकेमार्फत सुरू असलेल्या वृक्षगणनेतून समोर आले आहे. खासगी एजन्सीमार्फत गेल्या पंधरा महिन्यांपासून सुरू असलेल्या वृक्षगणनेत आतापर्यंत ४७ लाख ९२ हजार ७६६ वृक्षसंपदा आढळून आली असून त्यात सुमारे २७० प्रजाती निदर्शनास आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा काळात रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणा-या वृक्षतोडीचा मुद्दा समोर आला त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी त्यास जोरदार हरकत घेतल्याने प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने वृक्षतोडीला काही अटीशर्तींवर परवानगी दिली परंतु, महापालिकेला शहरातील वृक्षांची गणना करण्याचेही आदेशित केले. त्यानुसार, डिसेंबर २०१६ मध्ये अभिषेक कृष्ण यांच्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीत एका खासगी एजन्सीला वृक्षगणनेचे काम देण्यात आले. यापूर्वी सन २००७ मध्ये वृक्षगणना करण्यात आली होती. त्यावेळी सुमारे १८ लाख वृक्षसंपदा आढळून आली होती. आता नाशिक शहराची लोकसंख्या १८ लाखांवर जाऊन पोहोचली असता, शहरात वृक्षसंपदा तब्बल ४८ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. एजन्सीमार्फत शहरात ३ मीटरच्यावर वाढलेल्या वृक्षांची गणना केली जात असून आतापावेतो ४७ लाख ९२ हजार ७६६ वृक्ष आढळून आले आहेत. शहरातील जवळपास सर्व प्रभागांमधील गणना पूर्ण झाली आहे. मात्र, लष्करी हद्दीतील गांधीनगर विमानतळ परिसरातील वृक्षगणनेला अद्याप परवानगी मिळू शकलेली नाही. लष्कराकडून सदर परवानगी मिळविण्याचे प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहेत. लष्करी हद्दीत फोटोग्राफीस मनाई आहे. परंतु,वृक्षगणनेत फोटोग्राफी हा महत्वाचा घटक असल्याने त्या मुद्यावर परवानगीचे घोडे अडले आहे. गांधीनगर विमानतळ परिसरात सुमारे २० ते २२ हजार झाडे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, वृक्षसंपदा ४८ लाखांच्यावर जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे.