वृक्षसंपदा खाक : दगडखाणीमधील भु-सुरुंग स्फोटाने भडकला वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 02:04 PM2019-05-28T14:04:46+5:302019-05-28T14:11:09+5:30
डोंगरमाथ्यावरील मौलिक भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेसह जैवविविधतेची अपरिमित हानी झाली. हा वनवा सलग दोन दिवस भडकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
नाशिक : पश्चिम नाशिक वनविभागाच्या सातपूर वनपरिमंडळाच्या हद्दीत असलेल्या बेळगाव ढगा येथील संतोषा, भागडी या दोन डोंगराच्या माथ्यावर कृत्रिम वनवा भडकून डोंगरमाथ्यावरील मौलिक भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेसह जैवविविधतेची अपरिमित हानी झाली. हा वनवा सलग दोन दिवस भडकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डोंगराच्या पाठीमागे अगदी वनक्षेत्राला लागून दगडखाणीत भुसुरूंगाचे स्फोट घडविले जात असल्यामुळे त्याच्या ठिणग्या उडून वनवे भडकण्याचे प्रकार याठिकाणी सर्रासपणे घडत आहे; मात्र वनविभागाला अद्यापही याप्रकरणी एकही संशयित आढळून आला नसून केवळ ‘तपास’ सुरू आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते हे विशेष!
बेळगाव ढगा ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या पुढकाराने वृक्षराजी संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे. तीन वर्षांपुर्वी ४० एकर क्षेत्रात संतोषा, भागडी डोंगराच्या पायथ्याशी २७ हजाराहूंन अधिक रोपांची लागवड लोकसहभागातून करण्यात आली होती. डोंगराच्या एका बाजूला वृक्षराजी वाढवून वनक्षेत्राचे संवर्धन होत असले तरी दुसºया बाजूने सारूळ शिवारात हेच डोंगर दगडखाणीत उत्खनन करून पोखरले जात आहे. विशेष म्हणजे महसूल-वने विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गावकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बेळगाव ढग गावातील लोक डोंगराला हिरवाईचा साज चढविण्यासाठी कष्ट उपसत असताना दुसरीकडे या डोंगराची बाजू मात्र पोखरली जात आहे. त्यामुळे वनविभागाने येथील डोंगराचे व त्याभोवती असलेल्या वनक्षेत्राच्या संवर्धनासाठी कठोर पावले उचलून तातडीने संशयितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. गुरूवारी (दि.३०) महसुल-वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नाशिक दौ-यावर असून३३ कोटी वृक्षलागवडीबाबात ते प्रशासकीय बैठक घेणार आहेत. त्यांच्या दौ-याच्या तोंडावर कृत्रिम वनवा लागून दहा ते बारा वर्षांपुर्वीची शेकडो वृक्ष होरपळून गेली. तसेच पशुपक्ष्यांचे अंडी या भागात असल्यामुळे त्यांनीही आपली जागा सोडली नाही, परिणामी त्यांनाही जीव गमवावा लागल्याने पर्यावरण व निसर्गप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
जैवविविधतेची अपरिमित हानी
पाच ते दहा वर्षांपुर्वी नैसर्गिकरित्या डोंगरमाथ्यावर वाढलेली तीवस, करंज, साग, कहांडळ, बेडशिंगे, धामोडा, करवंद, शिवण यांसारख्या भारतीय प्रजातीची शेकडो झाडे दोन दिवसीय कृत्रीम वनव्यात खाक झाली. जैवविविधतेची होणारी अपरिमित हानी भरून न येणारी असून वनविभाग व जिल्हा प्रशासन, महसूल विभागाने संयुक्तरित्या कठोर कारवाई करण्याची मागणी आपलं पर्यावरण संस्था, ग्रीन रिव्हॅल्यूएशन, बेळगाव ढगा ग्रामपंचायतीसह नागरिकांनी केली आहे.