वनमंत्र्यांनी लावले होते झाड, चार वर्षांनंतर जागा ओसाड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 08:46 PM2021-03-04T20:46:40+5:302021-03-05T00:38:28+5:30
सुदर्शन सारडा ओझर (नाशिक) : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात राज्यात लावलेल्या ३३ कोटी वृक्षलागवडीची चौकशी विधीमंडळ समितीच्या सदस्यांमार्फत ...
सुदर्शन सारडा
ओझर (नाशिक) : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात राज्यात लावलेल्या ३३ कोटी वृक्षलागवडीची चौकशी विधीमंडळ समितीच्या सदस्यांमार्फत करण्याची घोषणा बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली असतानाच तीन वर्षांपूर्वी ओझर येथे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वहस्ते लागवड केलेला वृक्षच जळून गेल्याचे ह्यलोकमतह्णने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
जेथे वनमंत्र्यांनी लावलेल्या वृक्षाचेच नीटसे संवर्धन झालेले नाही, तेथे अन्य लागवडीची काय कथा, असा प्रश्न त्यानमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे. फडणवीस सरकारच्या काळात ह्यएकच लक्ष्य, ३३ कोटी वृक्षह्ण या मोहिमेअंतर्गत तीन वर्षांपूर्वी ओझर येथे मुनगंटीवार यांच्या हस्ते जुलै महिन्यात २०१७ मध्ये वृक्ष लागवडीचा दिमाखात प्रारंभ झाला होता. त्यानंतर ओझर येथीलच किनो थिएटरला कार्यक्रमही झाला होता. १ ते ७ जुलै या सप्ताहात चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. कमी वेळेत जास्त कार्यक्रम, ही भूमिका घेत वनमंत्र्यांनी विमानाने जाऊन राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ४ जुलैला मुनगंटीवार नाशिकला ओझर विमानतळ येथे उतरणार असल्याने जवळच्या जागेतच वृक्षलागवडीचे नियोजन चांदवडच्या वनाधिकाऱ्यांना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एचएएलमधील गणपती मंदिराजवळील जागा वृक्षलागवडीसाठी निश्चित केली होती. मात्र, चार वर्षांनंतर आता या जागेत ओसाड माळरान दिसत आहे. मुनगंटीवार यांनी वृक्षलागवड केली तेथे केवळ एक खड्डा उरला आहे. वृक्षासोबत लावण्यात आलेली वनमंत्र्यांच्या नावाची पाटीही गायब झालेली आहे.
लागवड अन् फोटोसेशन
वृक्षलागवड मोहीम ही बऱ्याचदा केवळ फोटोसेशन पुरतीच मर्यादित राहिली. त्यामुळे वनविभागाच्या एकूणच कार्यपद्धतीबद्दल आणि जिल्ह्यातील वृक्षलागवडीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.