राज्यातील सोळा लाख विद्यार्थ्याची कलचाचणी ; नाशिकच्या दोन लाख विद्यार्थ्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 06:52 PM2019-01-25T18:52:45+5:302019-01-25T18:55:52+5:30
दहावीतील विद्यार्थ्यांची आवड व त्यांचा विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रासोबतच कला कौशल्यांविषयीचा कल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या कल चाचणी परीक्षेला राज्यातील नऊ विभागांतून १६ लाख १ हजार ८८६ विद्यार्थी प्रविष्ट झाले.
नाशिक: दहावीतील विद्यार्थ्यांची आवड व त्यांचा विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रासोबतच कला कौशल्यांविषयीचा कल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या कल चाचणी परीक्षेला राज्यातील नऊ विभागांतून १६ लाख १ हजार ८८६ विद्यार्थी प्रविष्ट झाले.
शैक्षणिक क्षेत्रात भविष्यातील करिअरच्या वाटा निवडताना तसेच शिक्षणासाठी कोणते क्षेत्र निवडावे यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह श्यामची आई फाउंडेशन व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागामार्फत १८ डिसेंबर २०१८ ते १७ जानेवारी २०१९ या कालावधीत दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी परीक्षा घेण्यात आली. संपूर्ण राज्यभरात घेतल्या जाणाऱ्या या कलचाचणीसाठी यावर्षी प्रथमच सर्वत्र मोबाइल अॅपचा वापर करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांसोबतच पालकांचेही या परीक्षेसाठी मार्गदर्शन मिळाल्याचे नाशिक जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे समुपदेशक किरण बावा यांनी सांगितले.
विभागनिहाय प्रविष्ठ विद्यार्थी
राज्यातील नऊ विभागांपैकी पुणे विभागातून २ लाख ६९ हजार २३४ विद्याथ्यांनी ही परीक्षा दिली, तर नागपूरमधून १ लाख ६१ हजार ७४६, औरंगाबादमधून १ लाख ८२ हजार २२८, मुंबईतून ३ लाख ४१ हजार ९०१, कोल्हापूरमधून १ लाख ३९ हजार ७९५, अमरावतीतून १ लाख ६६ हजार, २९६, नाशिकमधून १ लाख ९९ हजार ५३४, लातूरचे १ लाख ६ हजार ६२२ व कोकणातून ३४ हजार ५३० असे एकूण १६ लाख १ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी कल चाचणी परीक्षा दिली.