पिडित तरुणीची फिर्याद : युवा कंपनी कामगाराचा मालकाकडून विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:42 PM2019-01-21T13:42:41+5:302019-01-21T13:43:04+5:30
रेवगडे याने तिच्यासोबत लज्जास्पद संवाद साधून अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. यानंतर युवतीने तत्काळ आरडाओरड केल्याने अन्य महिला धावून आल्याचे बघून रेवगडे याने तेथून काढता पाय घेतल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कारखानदाराने कारखान्यात नव्याने रुजू झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना रविवारी (दि.२०) रात्री उघडकीस आली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात त्या कारखानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंबड औद्योगिक वसाहतीत रघुनाथ रेवगडे यांच्या मालकीचा योगलक्ष्मी मेटल शॉप हा कारखाना आहे. या कारखान्यात मागील तीन दिवसांपासून चुंचाळे येथील एक युवती नोकरदार म्हणून काम करत होती. ही युवती निरक्षर असल्याने तिला कारखान्याच्या स्वच्छतेचे काम संबंधितांकडून सोपविण्यात आले होते. परंतु रेवगडे त्या युवतीस संगणकावरील चलन भरण्याचे काम शिकून घे, असे सांगितले व तिला कारखान्यामधील एका काचेच्या कक्षात घेऊने गेले असता पीडित युवतीने ते काम येत नसल्याचे सांगून नकार दिला. त्यानंतर रेवगडे याने तिच्यासोबत लज्जास्पद संवाद साधून अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. यानंतर युवतीने तत्काळ आरडाओरड केल्याने अन्य महिला धावून आल्याचे बघून रेवगडे याने तेथून काढता पाय घेतल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पीडित युवतीने तत्काळ घडलेला प्रकार पतीला कळविला. यानंतर पतीसोबत तत्काळ अंबड पोलीस ठाणे गाठून संशयित संशयित रेवगडे याच्याविरुद्ध फिर्याद दिली. फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा रेवगडेविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे करीत आहेत.