त्र्यंबकचे पिंड महापालिकेच्या खत प्रकल्पावर
By admin | Published: June 18, 2014 01:10 AM2014-06-18T01:10:27+5:302014-06-18T01:17:37+5:30
त्र्यंबकचे पिंड महापालिकेच्या खत प्रकल्पावर
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे गोदापात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी नारायण नागबली आणि अन्य विधीनंतरचे पिंड व निर्माल्य नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पावर प्रक्रियेसाठी पाठविण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात नगरपालिकेने महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला असून, त्यावर येत्या शुक्रवारी होणाऱ्या महासभेत निर्णय घेतला जाणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी प्रदूषणाच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी पुण्याच्या हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. त्यानुसार पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने गोदावरी नदीचा अभ्यास करून अहवाल लवादाकडे सादर केला आहे. त्याचवेळी नारायण नागबलीनंतर पिंड आणि अन्य साहित्य, निर्माल्य, अहल्या-गोदा संगमात टाकण्यात येत असल्याने त्याऐवजी ते नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पात पाठविण्याची सूचना करण्यात आली होती. नगरपालिकेने याबाबत महापालिकेला विचारणा केली आहे. सुमारे दोन टन हे साहित्य असणार असून, त्यासाठी आवश्यक ते शुल्क भरण्याची तयारी त्र्यंबक नगरपालिकेने दर्शविली आहे. महापालिका दररोज शहरातून सुमारे साडेतीनशे टन कचरा संकलित करते, त्यावर प्रक्रिया केली जाते. त्या तुलनेत त्र्यंबक नगरपालिकेचे दोन टन साहित्य नगण्य आहे. तथापि, यापूर्वी अशा प्रकारचा प्रस्ताव आला होता, तेव्हा महासभेने नकार दिला होता. त्यामुळे आता या निर्णयाकडे त्र्यंबक नगरपालिकेचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)