बालकुमार मेळाव्यात आदिवासी, ग्रामीण विद्यार्थ्यांचाही सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:27 AM2021-02-28T04:27:42+5:302021-02-28T04:27:42+5:30
नाशिक : साहित्य संमेलनातील बालकुमार मेळाव्यात आदिवासी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
नाशिक : साहित्य संमेलनातील बालकुमार मेळाव्यात आदिवासी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ‘बाल कविकट्टा’ याविषयी मार्गदर्शन करताना समितीप्रमुख संतोष हुदलीकर यांनी प्रत्येक सभासदाने पाच शाळा निवडून प्रत्येक शाळेकडून पाच चांगल्या कविता मागविण्यास सांगितले. बाल संमेलनात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी २५ जिल्ह्यांत वनवासी कल्याण आश्रम, वसतिगृहे, आश्रमशाळा यांच्याशी संपर्क साधून आलेल्या कवितांपैकी २०० सर्वोत्तम कविता निवडण्याचे निश्चित करण्यात आले. उपप्रमुख प्रा. सोमनाथ मुठाळ व योगिनी जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
संमेलनाचे कार्यवाह प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे, यावर मार्गदर्शन केले. कथा सादरीकरण ही कला आहे. त्या दृष्टीने मुलांकडून सराव करून घ्यावा. मुलांच्या स्वरचित कविता पुस्तकरूपात प्रसिद्ध कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संमेलनातील नियोजित कार्यक्रम, बालसाहित्यिकांचा सहभाग, ग्रंथदिंडी यांवर चर्चा झाली. त्यात संमेलनाचे कार्यवाह संजय करंजकर, नाशिकचे विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, राजेंद्र उगले, स्नेहल काळे यांनी सहभाग घेतला.
इन्फो
पुस्तक प्रकाशनासाठी नावनोंदणी
मराठी साहित्य संमेलनात ज्या लेखकांना पुस्तके प्रकाशित करायची असतील, त्यांच्यासाठी संबंधितांना संमेलनाच्या कार्यालयात नोंदणी अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अर्जामध्ये संबंधित लेखक व प्रकाशकांची प्राथमिक माहिती आणि पुस्तकाबद्दल महत्त्वाचे तपशील, तसेच त्या व्यतिरिक्त संबंधित लेखकाकडून एक हमीपत्रही भरून घेतले जाणार आहे. ज्यामध्ये कॉपीराईट, प्रकाशनासंदर्भातील तांत्रिक बाबी आणि कोविड २०१९ संदर्भातील दक्षता यासंबंधी पुरेशी दक्षता घेणे शक्य होणार आहे.