आदिवासी क्षेत्रविकास समितीकडून पेठ तालुक्यात पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:22 AM2019-06-19T01:22:36+5:302019-06-19T01:23:40+5:30
आदिवासी भागातील विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी व कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या आदिवासी क्षेत्रविकास आढावा समितीने मंगळवारी पेठ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय विभागांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली.
पेठ : आदिवासी भागातील विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी व कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या आदिवासी क्षेत्रविकास आढावा समितीने मंगळवारी पेठ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय विभागांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली.
विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली समितीने वनविभागाच्या वतीने रोजगार हमी योजनेंतर्गत करंजाळी येथे तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकेला भेट देऊन रोपांची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून या वर्षीच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेचे तालुक्याचे नियोजन समजून घेतले. करंजाळी येथे सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक वाचनालयास भेट देऊन पाहणी केली. वाचनालयास पुरेसे फर्निचर व पुस्तके प्राप्त करून देण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली. पेठ तालुक्यात अशाप्रकारची अद्ययावत अभ्यासिका पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. आदिवासी विकास विभाग संचलित बोरवठ येथील शासकीय आश्रमशाळा व पेठच्या शासकीय वसतिगृहाला भेट देऊन विवेक पंडित यांनी मुलांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अपुºया सुविधा, गैरसोय व कर्मचाºयांच्या रिक्त पदांबाबत विद्यार्थी व आदिवासी संघटनांनी विविध मागण्या मांडल्या.
पेठ येथील दादासाहेब बीडकर महाविद्यालयात वनविभाग व वनहक्क दावे तपशील या विषयावर झालेल्या आढावा बैठकीत ग्रामस्थांनी विविध समस्या मांडल्या.
यावेळी पाश्चिम उपवनसंरक्षक शिवाजी फुले, पूर्व विभागाचे तुषार चव्हाण, सहायक सचिन नेवसे, तहसीलदार हरीष भामरे, सहायक गटविकास अधिकारी अमित भुसावरे यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व विभागाचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.