आदिवासी पाड्यांवर जाऊन मोफत केशकर्तन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 06:36 PM2019-05-14T18:36:33+5:302019-05-14T18:37:34+5:30
सिन्नर : येथील कदम व तुपे या नाभिक परिवारातील बंधूंनी आदिवासी पाड्यांवर जावून मोफत केशकर्तन करुन समाजासमोर अनोखा आदर्श ठेवला आहे. सोमवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशी ६० गतीमंदांची रक्तगट तपासणी आणि मोफत केशकर्तन करण्यात आले.
येथील विजय आणि राजेंद्र रमेश तुपे व विजय, संतोष आणि शरद रामदास कदम या नाभिक बंधूंनी सुटीच्या दिवशी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये जाऊन तेथील मुलांचे मोफत केशकर्तन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. व्यवसाय सांभाळून प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करणारे संतोष कदम यांच्याकडून मोफत रक्तगट तपासणी केली जाते. गेल्या सोमवारी या पाचही भावांनी इगतपुरी तालुक्यातील साकुरफाटा येथे गतीमंदांसाठी काम करणाºया आधार संस्थेत जात तेथील मुलांशी गप्पागोष्टी करत त्यांच्या आवडीच्या हेअरस्टाईल करून दिल्या. दरम्यान संतोष कदम यांनी त्यांची मोफत रक्तगट तपासणीही करून दिली. आदिवासी पाड्यांवरील मुलांचे केस मोठ्या प्रमाणात वाढलेले असतात. वेळेवर अंघोळ नसल्याने त्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. ही बाब लक्षात घेऊन कदम आणि तुपे बंधूंनी अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील सोंगाळवाडी, सदगीरवाडी, अस्वलेवाडी, म्हाळुंगी या पाड्यांवर जाऊन तेथील ७० मुलांचे मोफत केस कापून दिले. त्यांची रक्तगट तपासणी करण्यासोबतच चांगल्या दर्जाचे शूज वाटप केले. अनवाणी पायांनी रानवाटा तुडविणाºया या मुलांना शूज देण्यासाठी सिन्नरचे सुनील बत्रा, नाशिकचे अनिल रायकर यांनी आर्थिक सहाय्य करत कदम आणि तुपे बंधूंच्या समाजकार्याला आणखी प्रेरणा दिली.