आदिवासी विकास घडामोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:16 AM2020-12-31T04:16:14+5:302020-12-31T04:16:14+5:30
कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आदिवासी विकास महामंडळ आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले. राज्यातील आदिवासी भागात महामंडळामार्फत मोठ्या प्रमाणात ...
कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आदिवासी विकास महामंडळ आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले. राज्यातील आदिवासी भागात महामंडळामार्फत मोठ्या प्रमाणात धान आणि भरड धान्य खरेदी करण्यात आल्याने, ऐन कोरोनाच्या काळात आदिवासी शेतकऱ्यांना आधार मिळाला. राज्यातील १८५ केंद्रांवरून ९ लाख ३७ हजार क्विंटल भातखरेदी करण्यात आला. ४९ हजार क्विंटलने खरेदीत वाढ झाली. रब्बी हंगामात महामंडळाने मे महिन्यापासून धान्य खरेदी सुरू केली, त्यात मका, संकरित ज्वारी आदी धान्यांचा समावेश होता.
अनलॉक लर्निंग
लॉकडाऊनचा काळ अनिश्चित असल्याने आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आदिवासी विकास विभागाने अनलॉक लर्निंग उपक्रम सुरू केला. या उपक्रमाच्या माध्यमातून आश्रम शाळांमधील शिक्षक थेट विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचले. कार्यपुस्तिका आणि कृती पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यात आले. यासाठी शासनाने २८ कोटींचा निधी मंजूर केला. या उपक्रमांतर्गतच विद्यार्थ्याची आरोग्य तपासणीही करण्यात आली. नवनियुक्त आदिवासी विकास आयुक्तांनीही हा उपक्रम सुरू ठेवला.
खावटी अनुदान
कोरोनाकाळात रोजगार गेल्याने राज्यातील आदिवासी बांधवांना खावटी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. शबरी आदिवासी विकास महामंडळातर्फे ही योजना राबविण्यात येणार असून, लवकरच राज्यातील ११ लाखांपेक्षा अधिक आदिवासींच्या खात्यावर खावटी अनुदान वर्ग करण्यात येणार आहे.