‘वन’वासीच्या संघ संकल्पनेला आदिवासींकडूनच छेद
By संजय पाठक | Published: October 15, 2018 01:38 AM2018-10-15T01:38:22+5:302018-10-15T01:38:53+5:30
देशातील मूळ रहिवासी असलेल्यांना ‘वनवासी’ संबोधून सेवा कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत वनवासी कल्याण आश्रमाच्या संकल्पनेला आता काही आदिवासींकडूनच हादरे देण्यास प्रारंभ झाला आहे. त्याअंतर्गत वनवासी कल्याण आश्रमाची मोटार रोखून त्यावरील वनवासी नाव खोडण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात घडला आहे तर दुसरीकडे थेट स्वयंसेवकांशी संपर्क साधून आदिवासींची संस्कृती बदलण्याचा प्रमाद करू नका, अशाप्रकारचे इशारेदेखील दिले जाऊ लागले आहेत.
नाशिक : देशातील मूळ रहिवासी असलेल्यांना ‘वनवासी’ संबोधून सेवा कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत वनवासी कल्याण आश्रमाच्या संकल्पनेला आता काही आदिवासींकडूनच हादरे देण्यास प्रारंभ झाला आहे. त्याअंतर्गत वनवासी कल्याण आश्रमाची मोटार रोखून त्यावरील वनवासी नाव खोडण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात घडला आहे तर दुसरीकडे थेट स्वयंसेवकांशी संपर्क साधून आदिवासींची संस्कृती बदलण्याचा प्रमाद करू नका, अशाप्रकारचे इशारेदेखील दिले जाऊ लागले आहेत.
देशातील मूळ निवासी असलेल्या आदिवासींच्या क्षेत्रात १९५२ पासून संघाची वनवासी कल्याण आश्रम शाखा काम करते. महाराष्टÑात १९७८ पासून या पद्धतीचे काम करण्यात येते. सेवा, शिक्षण आणि अन्य प्रकल्पांमधून आदिवासींना आधार देतानाच त्यांना उभारी दिल्याचा दावा आश्रमांकडून केला जातो. त्यासाठी अखिल भारतीय स्तरावर वनवासी कल्याण समितीशी संलग्न संस्था कार्यरत आहेत. मात्र, त्यातील नेमक्या वनवासी कल्याण आश्रम या नावातील वनवासी या शब्दाला आक्षेप घेण्यात येत आहे़ वनवासी, गिरीवासी, वनबंधू हे शब्द आदिवासींचे वेगळेपण दाखवितात, परंतु ते मूळ निवासी नसल्याचा आक्षेप असल्याचे सांगून त्याला अनेक ठिकाणी आदिवासी क्षेत्रात विरोध होऊ लागला आहे. विदर्भासह अनेक भागात वनवासी या शब्दाला विरोध केला जात असतानाच नाशिकमध्ये मात्र त्याला कृतिशील विरोधही होऊ लागला आहे.
वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते दिंडोरी तालुक्यात आदिवासी क्षेत्रात मुलांना खाऊ वाटपासाठी जात असताना त्यांचा पिच्छा करणाºया काही आदिवासी युवकांच्या कार्यकर्त्यांनी कोशिंबे येथे मोटार अडवली आणि आश्रमाच्या कार्यकर्त्यांकडे वनवासी शब्दावरून आक्षेप नोंदवला. बिरसा मुंडा किंवा तत्सम आदिवासी क्रांतिकारकांची नावे का वापरत नाही, असा जाब विचारला आणि मोटारीवरील वनवासी हे नाव खोडून टाकले. याप्रकरणी आश्रमाने लखन पवार या कार्यकर्त्यांसह अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वनवासी नाव खोडत असल्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. दुसरीकडे शासनाच्या टीआरटीआयच्या अशासकीय सदस्य प्रा. अशोक बागुल यांनी वनवासी आश्रमाच्या माध्यमातून काम करणाºया एका वैद्यकीय व्यावसायिकाला दूरध्वनी करून वनवासी शब्द तसेच आदिवासींच्या निसर्गदेवतेपलीकडे अन्य देवांच्या सुरू असलेल्या प्रसाराविषयी आक्षेप नोंदविला आहे.