आदिवासी मजुरांची घरवापसी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:34 PM2020-03-26T23:34:47+5:302020-03-26T23:35:12+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने संपूर्ण भारत १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन केल्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे रस्ते बंद झाल्याने आणि हाताला कामही न उरल्याने पेठ तालुक्यातील रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या शेकडो शेतमजुरांचा घरवापसीचा प्रश्न अवघड बनला आहे.
पेठ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने संपूर्ण भारत १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन केल्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे रस्ते बंद झाल्याने आणि हाताला कामही न उरल्याने पेठ तालुक्यातील रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या शेकडो शेतमजुरांचा घरवापसीचा प्रश्न अवघड बनला आहे.
मार्च महिना हा तसा द्राक्ष काढणीचा कालावधी असतो. याच काळात पेठ व सुरगाणा तालुक्यातील शेकडो शेतमजूर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर रोजगारासाठी स्थलांतरित होत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे सर्वत्र संचारबंदी लागू झाल्याने आता या मजुरांनाही गावाकडची ओढ लागली आहे. हाताला काम नाही, सोबत आणलेला शिधाही संपला, शासन घराबाहेर पडू देत नाही, सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने गावाकडे जावे तरी कसे या विवंचनेत मजूर सापडले आहेत. गत दोन दिवसापासून आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस व प्रशासनाच्या मदतीने आदिवासी भागातील सामाजिक संस्था व कार्यकर्ते या शेतमजूरांना आधार देत असून शासकिय प्रक्रि या पुर्ण करून टप्याटप्याने मजूरांना गावाकडे पाठवले जात आहे. गिरणारे, गंगापूर, पाथर्डी परिसरात हरसूल व त्या भागातील शेतमजूरांनी वाहनाअभावी ३५ ते ४० कि.मी. अंतर पायपीट करत आपले घर गाठले
आहे.
दरम्यान, पेठ तालुक्यातील मजुरीसाठी गेलेले काही लोक इतर भागात अडकलेले असू शकतात. तरी याबाबतीत काही माहिती मिळाल्यास ती तहसील कार्यालयास द्यावी, माहिती देताना त्यांचे मूळ गाव, किती लोक आहेत व नेमके कुठे आहेत त्याची माहिती द्यावी, असे आवाहन पेठ तालुक्याचे तहसीलदार, संदीप भोसले यांनी केले आहे.
आदिवासी भागातील घरातील काम करण्यायोग्य जोडपी रोजगारासाठी स्थलांतरीत होत असतात. त्यांची शाळेतील व लहान मुले मात्र आजी आजोबा किंवा शेजाऱ्यांच्या भरवशावर गावीच राहतात. सध्या सर्वत्र कोरोना बाबत काळजी घेतली जात असतांना स्थलांतरीत झालेल्या आई वडिलांना गावी असलेल्या मुले व नातेवाईकांची काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे कसेही करून गाव गाठण्यासाठी मजूर ताटकळत आहेत.