आदिवासींनी पाझर तलाव केला पुनर्जीवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 05:05 AM2018-08-05T05:05:55+5:302018-08-05T05:06:06+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यात जुन्या जलसंवर्धन रचनेतील १९७०च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तयार केलेला तब्बल ४६ वर्षांपूर्वीचा पाझर तलाव लक्ष्मणपाड्याच्या आदिवासींनी पुनर्जीवित केला आहे.
- अझहर शेख
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात जुन्या जलसंवर्धन रचनेतील १९७०च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तयार केलेला तब्बल ४६ वर्षांपूर्वीचा पाझर तलाव लक्ष्मणपाड्याच्या आदिवासींनी पुनर्जीवित केला आहे. त्यामुळे तीन पाड्यांवरील ९० कुटुंबांतील ३०० आदिवासी व २०० जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
सर्वाधिक पाऊस होऊनही आॅक्टोबरनंतर या तालुक्यातील आदिवासी गावे, पाड्यांवर पिण्याच्या पाण्याची चणचण भासते. विहिरीदेखील तळ गाठतात. नदी-नाले, ओहोळ आटतात. त्यामुळे टँकरवर भिस्त असते. पहिने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लक्ष्मणपाडा शिवारातील डोंगरपायथ्याला असलेल्या पाझर तलाव पुनर्जीवित करण्यासाठी लक्ष्मणपाडा, जावईवाडी, दगडमाळ पाड्यांवरील आदिवासी एकत्र आले. यंत्रणेच्या उपलब्धतेसाठी शासकीय पातळीवरून प्रतिसाद मिळाला नाही. जलयुक्त शिवारांतर्गतही आदिवासी ग्रामस्थांचे गाºहाणे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी ऐकले नाही. गावकºयांनी श्रमदानाची तयारी केली आणि खोलीकरणाचे काम हाती घेतले. त्यांना ‘बॉश’ उद्योग समूहाची मदत व मार्गदर्शन मिळाले. कल्याणकारी कामांतर्गत कंपनीने यंत्रणा उपलब्ध करून देत तीनही पाड्यांवरील मनुष्यबळाचा वापर करत लोकसहभागातून मृत झालेल्या तलावाला पुनर्जीवित केले.
>शेतीचे उत्पादन सुधारले
पाझर तलावाची दुरुस्ती व पुनर्जीवनाअगोदर मार्चपासून पावसाळ्यापर्यंत त्यामध्ये केवळ पाच ते सात फूट इतके पाणी नजरेस पडत होते. त्यामुळे जवळच्या एका विहिरीवर तीन गावांमधील ९० कुटुंबांची झुंबड उडत असल्याचे चित्र दिसत होते. मात्र हे चित्र बदलले असून, परिसरातील शेतीची उत्पादन क्षमताही सुधारली आहे.
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासींनी एकत्र येत पाझर तलावाचे खोलीकरण केल्याने पाण्याच्या साठवणूकक्षमतेत झालेली वाढ. पाझर तलाव सध्या असा ओसंडून वाहत आहे.नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाझर तलावाची खोलीकरणापूर्वी सुमारे दीड वर्षापूर्वी अशी अवस्था होती. त्यामुळे पाझर तलाव असून नसल्यासारखा झाला होता.