ताहाराबादच्या आदिवासींचा पंचायत समितीवर हल्लाबोल
By admin | Published: March 7, 2017 12:34 AM2017-03-07T00:34:48+5:302017-03-07T00:34:59+5:30
सटाणा : घरकुल अनुदान रखडल्याने पाच ते सहा वर्षांपासून उघड्यावर संसार असलेल्या बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील संतप्त आदिवासी बांधवांनी येथील पंचायत समिती कार्यालयावर हल्लाबोल केला.
सटाणा : घरकुल अनुदान रखडल्याने अक्षरश: गेल्या पाच ते सहा वर्षांपासून उघड्यावर संसार असलेल्या बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील संतप्त दीडशेहून अधिक आदिवासी बांधवांनी आज सोमवारी येथील पंचायत समिती कार्यालयावर हल्लाबोल केला. अचानक केलेल्या हल्लाबोलमुळे प्रशासनाची धावपळ उडाली.
ताहाराबाद ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या रावेर आदिवासी वस्तीत गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी १६३ घरकुल मंजूर करण्यात आले होते. घरे मंजूर झालेल्या आदिवासी बांधवांनी नव्या बांधकामासाठी जुन्या घरांची बांधकामे पाडली. त्यामुळे त्यांचा संसार पूर्णपणे उघड्यावर आहे. वेळोवेळी अनुदानासाठी पाठपुरावा केल्यानंतर पहिला हप्ता मिळाला. मात्र त्यानंतर अनुदान रखडल्याने गेल्या काही वर्षांपासून उघड्यावर संसार पडला आहे. निवारा नसल्यामुळे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण नाही. अनुदानासाठी अनेकवेळा ग्रामसेवकाकडे पाठपुरावा केला; मात्र उडवाउडवीच्या उत्तराशिवाय काही हाती न आल्याने संतप्त झालेल्या शंभर ते दीडशे आदिवासी बांधवांनी आज सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक येथील पंचायत समिती कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी संतप्त आदिवासी बांधवांनी गोंधळ घातल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. संतप्त आदिवासींचा जमाव पाहून कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, जिल्हा परिषद सदस्या रेखा पवार, ताहाराबादच्या सरपंच रत्ना सोनवणे, उपसरपंच प्रदीप कांकरिया, सीताराम साळवे यांनी जमावाला शांत करून मध्यस्थीची भूमिका घेतली. पंचायत समिती सभागृहात ग्रामविस्तार अधिकारी व्ही.पी. जाधव, रामकृष्ण खैरनार, घरकुलचे नितीन पाटील, ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे यांना पाचारण करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या नियमानुसार जे घरकुल मंजूर आहेत. आणि अनुदान हप्ता प्राप्त करण्यासाठी ज्या अटी-शर्ती लागू आहेत. त्यापूर्ण असतील अशा लाभार्थींना मार्चअखेर त्या टप्प्यातील अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यांनतर आदिवासी बांधवांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात महेश साळवे, दत्तू सोनवणे, रतन सोनवणे, शांताराम माळी, हरिश्चंद्र सोनवणे, केवळ मोरे, लक्ष्मण सोनवणे, भिवसन सोनवणे, शांताराम सोनवणे, रवींद्र माळी, गोटू सोनवणे, पिंटू अहिरे, हिरामण बाळू, कौतिक मोरे, धर्मा माळी, अंकुश सूर्यवंशी, विनोद सोनवणे यांच्यासह लाभार्थी आदिवासी बांधव सहभागी झाले होते. (वार्ताहर)