आदिवासींच्या हक्कांना धक्का लागणार नाही : उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 01:47 AM2019-10-13T01:47:31+5:302019-10-13T01:48:49+5:30
आम्ही सत्तेत आलो तर आदिवासींच्या हक्कावर गदा आणू, असे सांगून काही लोक गैरसमज पसरवित आहेत. मी आपणास शब्द देतो की, आदिवासींच्या हक्कांना कणभरसुद्धा धक्का लागू देणार नाही. उलट आदिवासींच्या हिताच्या जास्तीत जास्त योजना आणू, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
वणी/मनमाड/येवला : आम्ही सत्तेत आलो तर आदिवासींच्या हक्कावर गदा आणू, असे सांगून काही लोक गैरसमज पसरवित आहेत. मी आपणास शब्द देतो की, आदिवासींच्या हक्कांना कणभरसुद्धा धक्का लागू देणार नाही. उलट आदिवासींच्या हिताच्या जास्तीत जास्त योजना आणू, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
नाशिक जिल्ह्यातील वणी, मनमाड आणि येवला येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभांमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे नेते संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, रवींद्र मिर्लेकर, राज्यमंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी, खासदार भारती पवार, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, महिला संपर्क प्रमुख स्नेहल मांडे आदी उपस्थित होते.
शिवसेनेने वचननामा जाहीर केला असून त्यातील सर्व वचने पूर्ण करू असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करीत त्यांचा उतारा कोरा करणे ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. शिवसेनेने सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी उघड विरोध केला, मात्र सरकार अस्थिर होऊ दिले नाही, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
आगामी सरकार शिवसेना भाजप युतीचेच येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, मग तुमचे प्रश्न सोडविणे माझ्यावर सोपवा, अशा शब्दात ठाकरे यांनी आपल्या दायित्वाची स्पष्ट कल्पना दिली.
वचननाम्याप्रमाणे १० रु पयात जेवणाचे ताट तसेच १ रुपयात विविध आरोग्य चाचण्या, शिक्षण, पीकविम्याचा शेतकºयांना लाभ देणार असल्याचे ठाकरे म्हणाले. घरगुती विजेचा वापर ३०० युनिटपर्यंत असणाºयांसाठी दर कमी करणार असल्याचेही ते म्हणाले.
बाळासाहेबांवर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची चूक होती हे अजित पवार आता सांगतात, मग त्या प्रमुखाचे नाव का सांगत नाही? असा सवाल करीत, तुमच्या कर्माची फळे तुम्ही भोगताच आहात. निवडणुकीनंतरही ती भोगावी लागतील, असे उद्धव ठाकरे येवल्यात म्हणाले. बाळासाहेबांना जास्त यातना ज्यांनी दिल्या, त्यांना घरी बसविण्याची हीच वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवार यांना चिमटा
राज्यात शिवसेना-भाजप युतीचेच येणार आहे कारण काँग्रेस व राष्ट्रवादी संपली आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, एकटे शरद पवार ८० व्या वर्षी झुंज देत आहेत, हे कौतुकास्पद आहे. हा जोश जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी दाखविला असता तर ही वेळच आली नसती असा चिमटा त्यांनी काढला.
चौकशीही करायची नाही का?
ईडीच्या माध्यमातून जर कोणी सुडाचे राजकारण करीत असेल तर ते चुकीचे आहे; मात्र २० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांसाठी सुडाचेच राजकारण केले असल्याची आठवण ठाकरे यांनी करून दिली. ईडीने गुन्हा दाखल केल्याने शरद पवार यांनी रडारड केली. सुडाचे राजकारण म्हणून टाहो फोडला. ज्यांनी घोटाळे केले, त्यांची चौकशी पण करायची नाही का ? असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.
भटक्या विमुक्तांना वेगळ्या आरक्षणाचा विचार : आठवले
मनमाड येथील सभेमध्ये ठाकरे यांच्यासमवेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सुद्धा उपस्थित होते. केंद्रातील सरकारचा संविधान बदलण्याचा तसेच दलित आरक्षण रद्द करण्याचा कोणताही विचार नाही. याउलट भटक्या विमुक्तांसाठी वेगळे आरक्षण देण्याचा विचार सुरू असल्याचे यावेळी आठवले यांनी सांगितले.