आदिवासींच्या रिक्त पदभरतीसाठी आदिवासींचे ‘उलगुलान’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:27 AM2021-03-04T04:27:19+5:302021-03-04T04:27:19+5:30
नाशिक : राज्यातील आदिवासी बांधवांच्या हजारो जागा रिक्त आहेत. मात्र, त्या अद्याप भरण्यात आल्या नसल्याने त्या रिक्त ...
नाशिक : राज्यातील आदिवासी बांधवांच्या हजारो जागा रिक्त आहेत. मात्र, त्या अद्याप भरण्यात आल्या नसल्याने त्या रिक्त जागा राज्य शासनाने त्वरित भराव्यात, यासाठी ५ एप्रिलला मुंबईतील आझाद मैदानावर आदिवासी बांधवांचे उलगुलान अर्थात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिसंख्य पदाच्या माध्यमातून ९७ हजार खऱ्या आदिवासींच्या रिक्त जागा भरण्यासाठी विशेष पदभरती मोहीम राबविण्यात यावी, ज्यामुळे आदिवासी तरुणांची बेरोजगारी कमी होऊन खऱ्या आदिवासींना न्याय मिळेल, असेही जाधव यांनी नमूद केले. आदिवासी जमात व धनगर जात या संदर्भात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने सर्वेक्षण करून अहवाल शासनास सादर केला आहे. तो अहवाल शासनाने जाहीर करावा. राज्यातील काही आदिवासी गावे शंभर टक्के आदिवासी असून, तेथे कायमस्वरूपी आदिवासी सरपंच असतो. त्यामुळे जे गाव पेसा कायद्यापासून वंचित आहेत, त्या गावांचा सर्वेक्षण करून त्या गावांचा पेसा कायद्यात समावेश करावा. पेण येथे तीन वर्षांच्या आदिवासी मुलीवर एका नराधमाने बलात्कार करून तिला मारून टाकल्याच्या घटनेला चार महिने होत असूनही शासनाने दिशा शक्ती कायद्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे तत्काळ दिशा शक्ती कायद्याची अंमलबजावणी करून पाटील नावाच्या नराधमाला शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आदिवासी समाज बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असल्याने ५ एप्रिलला मुंबईच्या आझाद मैदानात तीव्र आंदोलनाचा इशारा जाधव यांनी दिला. यावेळी उपाध्यक्ष योगेश गावित, प्रमोद पाडवी, विक्रम पाडवी, मनीषा घांगळे, गोकुळ टोंगारे, अनिल फसाळे, नीलेश जुंदरे, रुक्मिणी ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.