पेठ तालुक्यातील आदिवासी महिलांची गगनभरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:03 AM2020-01-12T00:03:31+5:302020-01-12T01:28:27+5:30
घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक गाडा ओढताना होणारी तारांबळ बघून घरच्या गृहिणींनी निसर्गाचा आधार घेत वनौषधीपासून निरगुडी तेल तयार करण्याचा संकल्प केला आणि अल्पावधीत पेठ तालुक्यातील उस्थळेपैकी भोये पाडा येथील दोन आदिवासी महिलांनी गगनभरारी घेतली.
रामदास शिंदे ।
पेठ : घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक गाडा ओढताना होणारी तारांबळ बघून घरच्या गृहिणींनी निसर्गाचा आधार घेत वनौषधीपासून निरगुडी तेल तयार करण्याचा संकल्प केला आणि अल्पावधीत पेठ तालुक्यातील उस्थळेपैकी भोये पाडा येथील दोन आदिवासी महिलांनी गगनभरारी घेतली.
जयवंती देवीदास भोये व जयवंता राजेंद्र हिरकुडे या दोघी उस्थळे (भोयेपाडा) ता. पेठ येथील रहिवाशी. शिक्षण जेमतेम माध्यमिकपर्यंत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने केवळ चूल व मूल यात अडकून न बसता, निसर्गातील वनसंपत्तीचा योग्य वापर करून त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. जयवंता हिरकुडे यांचे वडील नारायण भुसारे पूर्वीपासून वनौषधीचे जाणकार होते. त्यांचाच वसा घेऊन या दोघींनी हा व्यवसाय पुढे आणला. भल्या पहाटे जंगलात जाऊन निरगुडी, निलगिरी, जास्वंद, तुळस, गवती चहा यांचा पाला जमा करून त्या घरीच कुटून त्याचे मिश्रण करतात. चुलीवर तापवून ऊर्ध्वपातन प्रक्रि येद्वारे त्याचे तेल तयार करण्यात येते. त्यात तिळतेल, कापूर आदी घटक योग्य प्रमाणात मिश्रित करून ५० व १०० मिलीच्या बाटल्यांमध्ये पॅकिंग केले जाते. हे तेल संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने बनवले असल्याने त्याचा सांधेदुखी, पाठदुखी, हातापायांना सूज, पॅरालिसीस, डोकेदुखी आदीवर गुणकारी समजले जाते.
विविध पुरस्कार प्राप्त
च्आदिवासी महिलांची या गरु ड भरारीला मानदेशी फाउण्डेशनने सहकार्य करत त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. च्नाशिकसह मुंबई, सातारा या ठिकाणी भरलेल्या प्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला असून, विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत.
च्दिवसभरातून जवळपास १५ ते २० लिटर निरगुडीचे गुणकारी तेल तयार करण्यात येत असून, पोलीसपाटील देवीदास भोये यांच्यासह कुटुंबातील व्यक्ती यांचे सहकार्य मिळत असल्याचे त्या दोघी सांगतात.
आदिवासी महिलांनी केवळ मजुरीवर अवलंबून न राहता शेतीपूरक अशा जोड व्यवसायाकडे वळणे गरजेचे असून, नैसर्गिक साधन सामग्रीचा योग्य वापर केल्यास आदिवासी कुटुंबाची उन्नती होऊ शकेल.
- जयवंती देवीदास भोये,
भोयेपाडा (उस्थळे)