श्रद्धांजली वटवृक्षाला !
By admin | Published: August 7, 2016 01:03 AM2016-08-07T01:03:07+5:302016-08-07T01:04:02+5:30
शोकसभा : ‘वृक्ष वाचवा, पृथ्वी वाचवा’चा दिला संदेश
पंचवटी : आतापर्यंत आपण एखादी मृत व्यक्ती किंवा खूपच झाले तर एखाद्या मृत प्राण्याला श्रद्धांजली वाहतानाचे बघितले आहे. दोन दिवसांपूर्वी राममंदिराजवळ कोसळलेल्या एका ऐतिहासिक वटवृक्षाला नाशिकच्या वृक्षप्रेमींनी चक्क श्रद्धांजली वाहत वृक्षसंपदेविषयीची आत्मीयता दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
राममंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ बुधवारी सायंकाळी १०० वर्षे जुना वटवृक्ष कोसळल्याची घटना घडली होती. पर्यावरण टिकून राहावे यासाठी वृक्ष वाचविणे ही काळाची गरज आहे, हे सांगण्यासाठी तसेच जुने वृक्ष टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नेचर क्लब आॅफ नाशिक, पर्यावरण प्रेमी व परिसरातील वृक्षप्रेमींनी एकत्र येऊन त्या कोसळलेल्या वटवृक्षाला श्रद्धांजली वाहत शोकसभा घेतली.
पंचवटीची ओळख वटवृक्ष असून, या वृक्षांना संरक्षण मिळावे, पेव्हर ब्लॉकमधून झाडांची सुटका होणे आवश्यक आहे. या वृक्षाच्या पारंब्या जमिनीपर्यंत पोहचू न दिल्याने तो कोसळल्याची खंत वृक्षप्रेमींनी व्यक्त केली. शहरात अनेक देशी वृक्ष असून त्यांच्या मुळांची वाढ खुंटत चालल्याने ते कधीही कोसळू शकतात.
यावेळी निशिकांत पगारे, आनंद बोरा, नरेश पुजारी, योगेश कापसे, योगेश बर्वे, चंद्रकांत दुसाने, आदिती आगरकर, प्रमिला पाटील, जयप्रकाश मुळे, आदिंसह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. (वार्ताहर)