महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 11:42 PM2020-05-07T23:42:52+5:302020-05-07T23:43:05+5:30
नाशिक : धम्मदीप हा मानवतेचा, जगताची प्रेरणा; महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना... अशा अनेक बुद्धगीतांच्या साक्षीने आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचे स्मरण करीत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला घरोघरी वंदन करण्यात आले.
नाशिक : धम्मदीप हा मानवतेचा, जगताची प्रेरणा; महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना... अशा अनेक बुद्धगीतांच्या साक्षीने आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचे स्मरण करीत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला घरोघरी वंदन करण्यात आले.
बुद्धपौर्णिमेनिमित्ताने शहरातील बौद्ध बांधवांच्या वतीने घरोघरी बुद्धवंदना आणि प्रतिमापूजन करण्यात आले. कोरोनामुळे कुठेही सार्वजनिक उत्सव साजरा न करता प्रत्येकाने अपापल्या घरी बुद्धमूर्तीला वंदन केले. मूर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करीत पुष्प अर्पण करण्यात आले. कुटुंबातील सदस्यांनी बुद्धवंदना घेत त्यांच्या प्रतिमेला वंदन केले. फिजिकल डिस्टन्स नियमाचे पालन करीत घरोघरी बुद्धजयंती साजरी करण्यात आली.
शहरातील मोठा राजवाडा, सातपूर राजवाडा, सिडको, पंचवटी, गंगापूर, म्हसरूळ, देवळाली गाव, विहितगाव, देवळालीकॅम्पसह अनेक गावांमध्ये दरवर्षी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. बुद्धपौर्णिमेला अनेक सामाजिक उपक्रमांचेदेखील आयोजन केले जाते. परंतु यंदा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम न घेता घरोघरी साधेपणाने पौर्णिमा साजरी करण्यात आली. कुटुंबातील सदस्यांनी पांढरे वस्त्र परिधान करीत बुद्धमूर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून मूर्तीला वंदन केले. यंदा लॉकडाउनमध्ये खीरदानाचा जाहीर कार्यक्रम कुठेही होऊ शकला नाही. बुद्धविहारांमध्ये भन्तेजींनी आपल्या निवडक अनुयायांसह बुद्धमूर्तीला वंदन करीत बुद्धवंदना घेतली. अनेक बुद्धविहारांत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.