शाळेच्या निर्लेखित जागेवर फडकविणार तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 06:26 PM2020-01-21T18:26:22+5:302020-01-21T18:26:36+5:30

हक्काच्या इमारतीसाठी लढा : ओझर जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचा एल्गार

 Tricolor to hit the designated space of the school | शाळेच्या निर्लेखित जागेवर फडकविणार तिरंगा

शाळेच्या निर्लेखित जागेवर फडकविणार तिरंगा

Next
ठळक मुद्दे यापूर्वी हजाराच्या वर असलेली पटसंख्या आता निम्म्यावर

सुदर्शन सारडा, ओझर : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील जिल्हा परिषदेची मुले क्रमांक १ व २ या शाळेची इमारत पाच वर्षांपूर्वी कौले बदलण्याच्या नावाखाली निर्लेखित करण्यात आली. मात्र, अद्याप त्या जागेवर नवीन इमारत उभी राहू शकलेली नाही. आता आपल्या हक्काच्या इमारतीसाठी शाळेतील सुमारे सहाशे विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या प्रजासत्ताकदिनी निर्लेखित जागेवरच तिरंगा फडकविण्याचा निर्णय घेतला आहे.
ओझर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे काम रखडल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. पाच वर्षांपूर्वी सदर शाळेची इमारत कौले बदलण्याचा विषय घेत निर्लेखित करण्यात आली. त्यानंतर मुलांची होणारी हेळसांड लक्षात घेता सर्वशिक्षा अभियानातून त्वरित मंजूर अकरा खोल्यांच्या निधीपैकी पन्नास टक्के निधी शाळेच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. परंतु, तोसुद्धा प्रशासनाने परत मागून घेतला. एकीकडे खासगी शाळा भरमसाठ सोयीसुविधा देत विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचत असताना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुविधा पुरविण्याबाबत प्रशासन अजूनही गंभीर झाल्याचे दिसून येत नाही. शिक्षणासारखा मूलभूत हक्क घेण्यासाठीही विद्यार्थ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याने पालकवर्गातही प्रचंड रोष आहे. त्यातच राजकीय अनास्थेमुळे या शाळेच्या इमारतीबाबत कुणी फारसे गांभीर्याने घेतलेले नाही. यापूर्वी हजाराच्या वर असलेली पटसंख्या आता निम्म्यावर येऊन ठेपली आहे. पटसंख्या वाढविण्याबाबत शिक्षकांवर दबाव टाकताना सुविधा पुरविण्याचा मात्र तसूभरही विचार केला जात नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनीच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट निर्लेखित जागेवरच येत्या प्रजासत्ताकदिनी तिरंगा फडकविण्याचा निर्णय घेतला आहे.
कोट....
ओझरच्या मुलांच्या शाळेसंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे. सदर प्रश्न प्राधान्याने सोडवला जाईल. एका नामांकित कंपनीबरोबर तसे बोलणे सुरू आहे. शाळेच्या इमारतीसंदर्भात लवकरच प्रश्न मार्गी लागेल.
- बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद

Web Title:  Tricolor to hit the designated space of the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.