‘तिरक्या रेषा हसरे बाण’ने दिला सुदृढ राहण्याचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:36 AM2017-10-06T00:36:28+5:302017-10-06T00:36:58+5:30
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच्यातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच्यातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ख्यातनाम व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांच्या हसून लोटपोट करणाºया ‘तिरक्या रेषा हसरे बाण’ या व्यंगचित्र प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानेश सोनार यांनी आपल्या अनोख्या शैलीतील व्यंगात्मक चित्र रेखाटून उपस्थित ज्येष्ठ नागरिक प्रेक्षकांना लोटपोट हसवले. अलीकडे घडत असलेल्या घटनांवर मार्मिक चित्र रेखाटताना विविध गंमती-जमती दर्शविल्या. नारायण राणेंप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांचेही आपल्या कुंचल्यातील अनोखे व्यंगचित्र रेखाटून उपस्थितांना खिळवून ठेवले. लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचतर्फे ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून निराधार ज्येष्ठांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये हरिभाऊ पैठणकर, अंजना वाघमारे, नामदेव पवार, सिंधूबाई मिसाळ, लक्ष्मण कुलकर्णी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आमदार सीमा हिरे यांनी आपल्या मनोगतातून ज्येष्ठ नागरिकांना निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर लोकज्योती साप्ताहिकाचे संपादक विद्याविलास पाटील, भा. रा. सूर्यवंशी, डी. एम. कुलकर्णी, ब्रिजमोहन चौधरी, रमेश डहाळे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.