‘रॅम’च्या अंतिम रेषेवर पुन्हा फडकविणार तिरंगा : १७ जूनपासून थरार
By admin | Published: June 5, 2017 10:17 PM2017-06-05T22:17:41+5:302017-06-05T22:17:41+5:30
अॅक्रॉस आॅफ अमेरिका (रॅम) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम रेषेवर तिरंगा फडकविण्यासाठी पुन्हा एकदा नाशिकच्या दोघा डॉक्टरांची जोडी सज्ज झाली आहे.
नाशिक : जगातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या अॅक्रॉस आॅफ अमेरिका (रॅम) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम रेषेवर तिरंगा फडकविण्यासाठी पुन्हा एकदा नाशिकच्या दोघा डॉक्टरांची जोडी सज्ज झाली आहे. ७२ तासांत अठराशेपेक्षा अधिक किलोमीटर अंतर कापून स्पर्धेच्या सहभागाच्या निकषावर खरे उतरलेले सायकलपटू डॉ. राजेंद्र नेहेते व डॉ. रमाकांत पाटील यांनी रॅम जिंकू न पुन्हा भारताचे नाव उंचविण्याचा निर्धार पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
नाशिकच्या डॉक्टर महाजन बंधूंनी २०१५ साली ‘रॅम’मध्ये तिरंगा फडकविला होता. यानंतर पुन्हा नाशिकचे नेहेते, पाटील ही एक जोडी तर मुंबईचे पंकज मारलेशा आणि डॉ. संदीप शेवाळे या दुसऱ्या जोडीचा भारतीय संघात समावेश आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘रॅम’चा संकल्प त्यासाठी सुमारे सहा महिन्यांपासून सुरू असलेला सराव, स्पर्धेचे नियम, निकष आणि विविध खडतर टप्पे आदिंबाबत माहिती दिली.
यावेळी नेहेते व पाटील म्हणाले, ‘रॅम’ शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी बघणारी स्पर्धा आहे; मात्र इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर या स्पर्धेत आम्ही विजय मिळवून भारताचा तिरंगा फडकविण्याचा पूरेपूर प्रयत्न करणार आहे. वाळवंटातील ४६ अंश तपमान तर कधी बर्फाळ प्रदेशातील शून्य अंश तपमानातील परिसरातून जाणारा ‘रॅम’चा मार्ग आम्ही सर करण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून कसोशीने सराव करीत आहे. स्पर्धेच्या सहभागाविषयीच्या निकषाप्रमाणे आमच्या जोडीने सुमारे १८५० किलोमीटर अंतर अवघ्या ७२ तासांत पूर्ण केल्याची माहिती पाटील यांनी दिली. सायकलपटू स्पर्धकांना रस्ता मार्गदर्शक ते आरोग्यापर्यंत सर्वच प्रकारची काळजी सहायक चमूचे बारा ते सोळा डॉक्टर मित्र घेणार आहेत. चमूचे प्रमुख डॉ. सुनील वर्तक, डॉ. चंद्रशेखर संकलेचा, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. आशुतोष ठोळे आदि यावेळी उपस्थित होते.