त्र्यंबक ग्रामीण रु ग्णालयात तोडफोड
By admin | Published: April 12, 2017 12:50 AM2017-04-12T00:50:55+5:302017-04-12T00:51:13+5:30
बालकाचा अपघाती मृत्यू : कारसह चालक फरार
त्र्यंबकेश्वर : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील खंबाळे फाट्यावर रस्ता ओलांडणाऱ्या बालकास कारने दिलेल्या धडकेने तो जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. घटनेनंतर संशयितांच्या अटकेच्या मागणीसाठी संतप्त झालेल्या जमावाने ग्रामीण रु ग्णालयात तोडफोड केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
खंबाळे येथील कचरे कुटुंबीय हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी येथे दर्शनार्थ गेले होते. ते परतताना सव्वाचार वाजता खंबाळे फाट्यावर उतरले. उतरल्यानंतर ते व अन्य लोक घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना कारने अविनाश संजय कचरे (८) या बालकाला धडक दिली. त्यात बालकाचा जागीच मृत्यू ओढवला. धडकेनंतर कारचालकाने बालकाला त्याच्या नातेवाईकांसह त्र्यंबकेश्वर येथे आणले. मात्र त्यांना शासकीय रु ग्णालयात नेण्याऐवजी डॉ. रोहीत शेजवळ यांच्या खाजगी दवाखान्यात नेले. यावेळी कार चालक गाडी लावण्याच्या बहाण्याने फरार झाला. दुर्दैवाने कारचा क्रमांक कुणीही घेतला नव्हता. दरम्यान डॉ.शेजवळ यांनी मुलाला सरकारी रु ग्णालयात नेण्याचा सल्ला दिल्यानंतर मृतदेह घेऊन नातलग सरकारी रु ग्णालयात पोहोचले असता वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र दुसाने यांनी बालकाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. एकुलता एक मुलाचा अपघाती अंत झाल्याने व संशयितही फरार असल्याने मृताच्या नातेवाईकांनी जोपर्यंत फरार चालक व कारचा शोध लावण्यात येत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. संतप्त जमावाने ग्रामीण रु ग्णालयात तोडफोडही केली. शिवाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन देखील केल्याने वाहनांची रांग लागली होती. घटनेचे वृत्त कळताच पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. काही वेळाने जमावावर नियंत्रण मिळवण्यात पोलीसांना यश आले. (वार्ताहर)