सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे त्र्यंबकला रस्ता सुरक्षा अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 02:47 PM2021-01-29T14:47:10+5:302021-01-29T14:47:54+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील जव्हार फाट्यावरील श्री गजानन महाराज चौकात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे त्र्यंबक उपविभाग १ व २ तर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले.
उद्घाटन आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियान फलकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी वाहनांना रिफ्लेक्टर्स लावण्यात आले. यावेळी खोसकर यांनी वाहनांना रिफ्लेक्टर्स लावताना वाहनचालकांना गाड्या सावकाश चालवा, वाहतुकीचे नियम पाळा व मद्यप्राशन करुन वाहने चालवू नका असे आवाहन करीत प्रबोधन केले. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर ,उपनगराध्यक्ष सागर उजे व ज्येष्ठ नेते मधुकर लांडे आदींनीदेखील वाहनांना रिफ्लेक्टर्स लावले. प्रास्तविक सा.बां. विभागाचे उपविभागीय अभियंता संदीप पांडांगळे यांनी केले.
हल्ली बेशिस्तपणे वाहन चालविण्यामुळे होणाऱ्या अपघातात अनेक लोकांना प्राणाला मुकावे लागले असून काही जण आयुष्यभरासाठी दिव्यांग झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे पांडांगळे यांनी सांगितले. यावेळी युवराज कोठुळे, राजेंद्र बदादे, अरुण वायाळ, शांताराम मुळाणे आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज, श्रेणी १ सहायक अभियंता २ त्र्यंबक सोनवणे तसेच सर्व शाखा अभियंता कार्यालयीन कर्मचारी आदींसह वाहनचालक व नागरिक उपस्थित होते.