त्र्यंबकराजा काळारामाला करणार बिल्वपत्र अर्पण
By धनंजय वाखारे | Published: November 22, 2023 05:17 PM2023-11-22T17:17:33+5:302023-11-22T17:17:47+5:30
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार यावर्षीदेखील रथोत्सवाचे नियाेजन करण्यात आले आहे.
वसंत तिवडे
त्र्यंबकेश्वर (नाशिक) : येत्या २६ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा व वैकुंठ चतुर्दशीला त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने होणाऱ्या रथोत्सव सोहळ्याचे नियोजन झाले आहे. यावर्षी प्रथमच देवस्थानतर्फे विश्वस्त स्वप्निल शेलार व विश्वस्त पुरुषोत्तम कडलग हे हरीहर भेटीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंग मंदिरातून बिल्वपत्र घेऊन नाशिक येथे काळाराम मंदिरात प्रभू श्री रामचंद्रास अर्पण करतील, तर काळाराम मंदिरातून तुळशीपत्र प्रभू श्री त्र्यंबकराजांना अर्पण करण्यासाठी घेऊन येतील.
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार यावर्षीदेखील रथोत्सवाचे नियाेजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी रात्री १२ ते उत्तररात्री २:३० वाजेपर्यंत वैकुंठ चतुर्दशीची विशेष महापूजा, पालखी सोहळा व हरिहर भेट होईल. रविवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सकाळच्या सत्रात देवस्थानतर्फे गंधअक्षदेचा कार्यक्रम होणार आहे, तर १:३० ते ३:३० या वेळेत देवस्थानतर्फे सरदार विंचुरकरांच्या वतीने महापूजा करण्यात येईल. दुपारी ३:३० वाजता रथोत्सवास सुरुवात होणार असून, श्री त्र्यंबकराजांचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा रथातून सवाद्य मिरवणुकीने कुशावर्तावर नेला जाणार आहे. कुशावर्त कुंडावर महापूजा करण्यात येईल.
यावर्षीपासून प्रथमच तीर्थराज कुशावर्त येथे असलेल्या दीपमाळेचे पूजन व प्रज्वलन विश्वस्तांच्या हस्ते करण्यात येईल. याबरोबरच सायंकाळी ६:३० वाजेपासून रथाचा मंदिराकडे परतीचा प्रवास सुरू होईल. परतीच्या मार्गावर फटाक्यांची आतषबाजी, शोभेचे दारूकाम होणार आहे. रात्री ८ वाजता मंदिर प्रांगणातील दीपमाळेचे प्रज्वलन व पूजन करण्यात येणार आहे.