त्र्यंबकेश्वरला महाशिवरात्र उत्साहात
By admin | Published: February 18, 2015 12:27 AM2015-02-18T00:27:20+5:302015-02-18T00:27:59+5:30
त्र्यंबकेश्वरला महाशिवरात्र उत्साहात
त्र्यंबकेश्वर : महाशिवरात्र असल्याने संपूर्ण त्र्यंबकनगरी उत्साहात न्हाऊन निघाली होती. संपूर्ण शहरात हर हर महादेवचा जयघोष सुरू होता, तर आपला नंबर लागेपर्यंत दर्शनार्थीचे भजन सुरू होते. त्र्यंबकेश्वर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
सोमवारी रात्री जयतीर्थ यांच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. तत्पूर्वी स्कूल आॅफ आर्टिलरीतर्फे बँड पथकाची सलामी देण्यात आली, तर मंगळवारी नटराज मंडळातर्फे ओम नटराज नृत्य मंडळाचा गंगावतरण कार्यक्रम झाला. संपूर्ण मंदिर परिसरात धार्मिक वातावरण होते.
दरम्यान, दुपारी ३.१५ वाजता पालखी उत्सवास सुरुवात झाली. आज पाचआळीमार्गे पालखी श्री जोगळेकर यांच्या वाड्यावरून मिरवणुकीने तीर्थराज कुशावर्तावर आणण्यात आली. तेथे पूजाविधी झाला. त्यानंतर परत पालखी त्र्यंबकेश्वर मंदिरात आणण्यात आली. मिरवणुकीत विलास मोरे यांचे नाशिकरोड चौघडा असे होते. देवस्थानचे दर सोमवारचे वाजंत्री होते. देवाचा पंचमुखी मुखवटा आज फिरविण्यात आला.खजूर, कवठ, उसाचा रस, बेलतीर्थ यांना मोठी मागणी होती. कवठ ५ ते १० रुपयाला १ या प्रमाणे विकली गेली. तसेच फराळांच्या पदार्थांनाही बऱ्यापैकी मागणी होती. विशेष म्हणजे आजची गर्दी जास्त प्रमाणात दिसून आली नाही.
(वार्ताहर)